|| एजाज हुसेन मुजावर

सोलापूरमध्ये ज्येष्ठ नेत्यावर विषप्रयोगाचा स्वपक्षीयांवरच संशय

मोदी लाटेत केंद्रापाठोपाठ राज्यात आणि नंतर स्थानिक पातळीवर सोलापूर महापालिकेतही सत्तेचा सोपान गाठणाऱ्या भाजपला गेल्या चार वर्षांत सत्तेच्या धुंदीत गटबाजीने प्रचंड  प्रमाणात ग्रासले आहे. या सत्ता संघर्षांतून सोलापूर महापालिकेचे तत्कालीन सभागृह नेत्यावर विषप्रयोगापर्यंत मजल गेल्याने भाजपची बेअब्रू झाली आहे. हा विषप्रयोगाचा आरोप थेट महापौर आणि पक्षाचे शहराध्यक्षांसह पाचजणांवर झाल्याने पक्षांतर्गत सत्तासंघर्षांतून आणखी कोणते टोक गाठणे बाकी राहिले, हेच पाहावयाचे आहे. विषप्रयोगाचा आरोप सर्व संबंधितांनी स्वच्छ शब्दात फेटाळला असला तरी सोलापुरात सत्ताधारी भाजपची जी काही शोभा होते आहे, तेवढी पुरे, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

पालकमंत्री विजय देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि खासदार शरद बनसोडे या तिघांची तोंडे एकमेकांच्या विरुद्ध दिशेलाच राहिली आहेत.  सलग तीनवेळा आमदार होऊन राज्यमंत्री बनलेले आणि योगायोगाने सोलापूरचे पालकमंत्रीही झालेले विजय देशमुख आणि नंतर उशिरा सहकार, पणन आणि वस्त्रोद्योगमंत्री झालेले सुभाष देशमुख या विस्तवही जात नाही. त्यांच्या गटबाजीत उडी घेत खासदार बनसोडे हे पालकमंत्र्यांच्या बाजूने आणि सहकारमंत्र्यांच्या विरोधात सतत भूमिकेत राहिले आहेत. ही गटबाजी थांबायचे नाव घेत नसतानाच सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत सत्ताबदल झाला आणि भाजपचा कारभार सुरू झाला खरा; परंतु सत्तासंघर्षांतून पक्षांतर्गत गटबाजी अनियंत्रितच झाली. महापौर निवडीपासून ते अर्थसंकल्प मांडणे असो वा कोणताही धोरणात्मक निर्णय घेणे असो, प्रत्येकवेळी शह-काटशह हे गटबाजीचे वादळ पक्षात सतत घोंगावतच राहिले.

सुरुवातीपासून गटबाजी

पालकमंत्री विजय देशमुख यांचा विरोध झुगारून सहकारमंत्री सुभाष देशमुख गटाच्या शोभा बनशेट्टी महापौर झाल्यानंतर त्याला पर्याय म्हणून पालकमंत्री गटाचे ज्येष्ठ नगरसेवक सूर्यकांत ऊर्फ सुरेश पाटील हे सभागृहनेता झाले. मग पुढे एकमेकांची जिरवण्याचेच राजकाररण शिजत गेले. ११ महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी दोन्ही मंत्री देशमुखांची कानउघाडणी करून या दोघांनी गटबाजी आवरती घेतली नाही तर सोलापूर महापालिका बरखास्त करावी लागेल, अशा भाषेत तंबी दिली होती. त्याचा परिणाम ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेत दोन्ही मंत्री देशमुखांनी एकमेकांच्या तोंडात ‘हुग्गी’ (खीर) भरविण्यात झाला. परंतु त्याची गोडी काही दिवसच राहिली.  पक्षाचे प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी यांच्यासारख्या अनुभवी धुरिणांनी तर कोठे आहे गटबाजी, असा सवाल करीत ही गटबाजी केवळ प्रसार माध्यमांनाच दिसते. अशा शब्दात  विजय देशमुख आणि सुभाष देशमुख हे दोघेही एकोप्याने राम-लक्ष्मणाच्या जोडीप्रमाणे काम करीत आहेत, अशी प्रशस्तीही जोडली होती.

अशा कमालीचे टोक गाठलेल्या सत्तासंघर्षांच्या पाश्र्वभूमीवरच तत्कालीन सभागृहनेते सुरेश पाटील हे अचानकपणे आजारी पडले आणि त्यांच्या शरीरात जीवघेणा विषारी पदार्थ आढळून आला. मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये सलग पाच-सहा महिने तज्ज्ञ डॉक्टरांनी केलेल्या शर्तीच्या प्रयत्नांमुळे पाटील हे मृत्यूच्या दाढेतून सहीसलामत वाचले. या प्रकरणाची माहिती कळवूनदेखील पोलिसांनी चौकशी केली नाही. पालकमंत्री विजय देशमुख यांच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेत सीआयडी चौकशीचे आदेश दिले खरे; परंतु प्रत्यक्षात चौकशी रेंगाळली आहे. अलीकडे सर्वपक्षीय मोर्चा निघाल्यानंतरही चौकशी रेंगाळलीच आहे.

स्वकीयांवरच आरोप

न्याय मिळण्यासाठी नगरसेवक सुरेश पाटील हे संघर्ष करीत असताना आपल्यावर झालेल्या विषप्रयोगाप्रकरणी दस्तुरखुद्द महापौर शोभा बनशेट्टी, त्यांचे पती श्रीशैल बनशेट्टी यांच्यापासून ते भाजपचे शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी, राज्य शिखर बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे सदस्य अविनाश महागावकर आदी पाचजणांवर ठपका ठेवला आहे. तसा लेखी फिर्यादी जबाबही त्यांनी पोलिसांत दिला आहे. आरोप महापौरांसह सर्वांनीच स्पष्ट शब्दात फेटाळला आहे, तर पोलीसही चौकशीअंतीच पुढील कारवाई करण्याची भूमिका स्पष्ट केल्याने नगरसेवक पाटील हे अस्वस्थ झाले आहेत. पोलीस कारवाईसाठी त्यांनी आमरण उपोषणाचा इशाराही दिला आहे. विषप्रयोगाचा गंभीर आरोप महापौर, पक्षाचे शहराध्यक्ष आणि राज्य शिखर बँकेच्या प्रशासकीय मंडळाच्या एका सदस्यावर त्यांच्याच सत्ताधारी पक्षाच्या सुरेश पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ नगरसेवकाने केल्याने त्याचे  गांभीर्य वाढले आहे. यात कोण खोटे आणि कोण खरे, याचा उलगडा  तपासातूनच होणार आहे. पोलीस तपास निष्पक्ष पद्धतीने होणे अपेक्षित आहे. असा निष्पक्ष पद्धतीने तपास होईल काय, याची हमी कोण देणार, हा सवाल आहे. विषप्रयोगाचा आरोप करणारे सुरेश पाटील आणि विषप्रयोग केल्याचा ज्यांच्यावर आरोप झाला, त्या महापौरांसह प्रत्येकाची नार्को चाचणी झाल्यास तपासाला योग्य दिशा मिळू शकेल, असे मत कायदेतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

महापौरांची पोलिसांकडून चौकशी

ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांच्यावर झालेल्या विषप्रयोगाप्रकरणी त्यांना न्याय मिळण्यासाठी यापूर्वी सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता. आता त्यांच्या बाजूने न्याय मिळण्यासाठी धनगर समाजही पुढे आला आहे. धनगर समाजाचे असलेले काँग्रेसचे विधान परिषद सदस्य अ‍ॅड. रामहरी रूपनवर यांनी पाटील विषप्रयोग प्रकरण विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित करण्याचे ठरविले आहे. दुसरीकडे धनगर समाजाच्या वतीने ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिरात सुरेश पाटील यांना न्याय मिळण्यासाठी साकडे घालत महाआरती करण्यात आली. पाटील यांनी दिलेल्या जबाबानुसार अखेर पोलिसांनी महापौर शोभा बनशेट्टी, त्यांचे पती श्रीशैल बनशेट्टी, भाजपचे शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी आदी सर्वाना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांची साडेचार तास कसून चौकशी केली. प्रत्येकाचे जबाबही नोंदविले. अर्थात, या सर्वानी आपल्यावर सुरेश पाटील यांनी केलेले आरोप फेटाळले आहेत.