नांदेड-वाघाळा शहर मनपा निवडणुकीच्या निमित्ताने भाजपमध्ये गेल्या काही आठवडय़ांपासून चाललेल्या ‘गोंधळात गोंधळ’च्या प्रयोगात आता ‘मानापमान..’ची भर पडली असून पक्षाचे उमेदवार ठरवताना नव्यांना वाव अन् जुन्यांवर घाव असे धोरण रेटण्यात आले.

येत्या ११ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या निवडणुकीतील भाजप आणि काँग्रेससह इतर राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांची नावे शनिवारी स्पष्ट झाली. तत्पूर्वी भाजपमध्ये शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी सकाळपर्यंत ‘मानापमान’चा प्रयोग रंगला होता. शिवसेना आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या माध्यमातून पक्षात आलेल्यांना उमेदवारीत झुकते माप देताना प्रमुख संभाव्य उमेदवारांचे तिकीट कापण्यात आल्याचे अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी स्पष्ट झाले. भाजपत तीन वर्षांपूर्वी आलेले माजी महापौर अजयसिंह बिसेन, सुधाकर पांढरे यांच्यासह पक्षाचे उपक्रमशील सरचिटणीस दिलीप ठाकूर, भाजप महिला आघाडीच्या धनश्री देव, माजी नगरसेवक प्रा.नंदू कुलकर्णी यांच्यासह अनेक जुन्या कार्यकर्त्यांना भाजपने उमेदवारी नाकारल्याचे आज स्पष्ट झाले. पक्षातील गोंधळाच्या परिस्थितीमुळे सुधाकर पांढरे शिवसेनेच्या उंबरठय़ावर होते; पण त्यांची तापदायक बंडखोरी थोपविण्यात भाजप नेत्यांना शनिवारी यश आले. मनपाच्या ८१ जागांचे उमेदवार निश्चित करण्यासाठी भाजपच्या निवडणूक समितीत २७ जण होते. त्यात आमदार चिखलीकर व श्यामसुंदर शिंदे यांचाही समावेश होता. या दुकलीने भाजपची २५ हून अधिक तिकिटे आपल्या खिशात घातली आहेत. मागील महिनाभरात पक्षात आलेल्यांसह शुक्रवारी रात्री काँग्रेस सोडणाऱ्या संतोष मानधने यांनाही भाजपने शनिवारी शिवाजीनगर प्रभागात उमेदवारी बहाल केली. आ. चिखलीकर यांचा पुतण्या संदीप, ओमप्रकाश पोकर्णा यांचा मुलगा नवल, प्रा.सुनील नेरलकर यांचा पुतण्या आशिष, सुधाकर पांढरे यांची कन्या स्नेहा, दिलीप कंदकुत्रे यांचे पुत्र कुणाल हे व अन्य काही घराणेशाहीचे प्रतिनिधी भाजप उमेदवारांमध्ये आहेत. दोन दिवसांपूर्वी पक्षाच्या स्थानिक पक्षनेतृत्वाचा शिवराळ भाषेत समाचार घेणाऱ्या प्रवीण जेठेवाड या ‘मुख्यमंत्री मित्र’ कार्यकर्त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. मुख्यमंत्र्यांशी नातेसंबंध असलेल्या देवेंद्र डोईफोडे यांना उमेदवारी नाकारून महेश उर्फ बाळू खोमणे यांच्या उमेदवारीवर भाजपने शिक्कामोर्तब केले.