मुख्यमंत्र्यांचा धुळे दौरा शहर व जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा असतानाही या दौऱ्यात भाजपमधील स्थानिक पातळीवरील गटातटाचे राजकारण पुन्हा प्रकर्षांने समोर आले. स्थानिक आमदार अनिल गोटे यांच्या पुढाकारातून आयोजित मुख्यमंत्र्यांच्या सभेला भाजपचे काही पदाधिकारी वगळता इतर फिरकलेच नाहीत. दुसरीकडे संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी राम पॅलेसमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीस अनिल गोटे यांनी दांडी मारली. या ठिकाणी भाजपचे पदाधिकारी मात्र आवर्जून उपस्थित होते. स्थानिक पातळीवरील या घडामोडीमुळे मुख्यमंत्र्यांनाही दोन्ही गटांना सांभाळण्याची कसरत करावी लागली.

मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाच्या श्रेयवादावरून धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. भामरे आणि धुळे शहराचे आमदार गोटे यांच्यातील वाद सर्वश्रुत आहेत. या मार्गासाठी काही वर्षांपूर्वी गोटे यांनी तीव्र आंदोलन केले होते. यामुळे या रेल्वेमार्गास मंजुरी मिळाल्याचा गोटे यांचा दावा कालांतराने केंद्रात मंत्री बनलेल्या डॉ. भामरे यांनी अप्रत्यक्षपणे खोडून काढला होता. ही बाब स्थानिक पातळीवर डॉ. भामरे आणि गोटे यांच्यातील मतभेदाचे कारण ठरली. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात भाजपमध्ये स्थानिक पातळीवर जाहीरपणे मतभेद किंवा वाद झाला नाही. गोटे हे कोणाचेही ऐकून घेणारे नाहीत. त्यामुळे पक्ष पदाधिकाऱ्यांची नाराजी आहे. उघडपणे ही नाराजी व्यक्त होत नाही. गोटे यांनी आयोजिलेल्या कार्यक्रमांना हजेरी न लावणे हा मार्ग अनुसरला जातो. शासनातर्फे उभारण्यात आलेल्या भव्य वास्तू आणि झालेल्या तसेच होऊ  घातलेल्या विकासकामांच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांचा दौरा महत्त्वाचा होता. या वेळी गोटे यांनी पांझरा नदी पात्रात घेतलेली जाहीर सभा आणि भामरे यांनी राम पॅलेसमध्ये घेतलेली भाजपची बैठक तथा मेळावा यातून भाजपमधील अंतर्गत मतभेद प्रकर्षांने समोर आले. सभास्थळी गोटे हे संस्थापक अध्यक्ष असलेल्या ‘लोकसंग्राम’च्याच कार्यकर्त्यांचा अधिक भरणा होता. या सभेत भाजपचे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, सुनील नेरकर, अमित खोपडे अशी बोटावर मोजण्याइतकी मंडळी वगळता इतर पदाधिकारी अनुपस्थित राहिले. दुसरीकडे मात्र भामरे यांनी राम पॅलेसमधील बैठकीला शहरासह तालुका आणि ग्रामीण भागातील सर्वच पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली. पक्षातील या घडामोडी मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आल्या नसतील, असे म्हणता येणार नाही. सभास्थळी येणे टाळणारी ही मंडळी मुख्यमंत्र्यांची सभा संपल्यानंतर रात्री उशिरा घेतलेल्या बैठकीला मोठय़ा संख्येने उपस्थित राहते याचाच अर्थ पाणी कुठे तरी मुरतेय याची कल्पना आल्याने मुख्यमंत्र्यांनी डॉ.भामरे आणि गोटे यांच्या भूमिका काय ते प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी पदाधिकारी-कार्यकर्त्यांना उद्देशून आवश्यक त्या सूचनाही दिल्या.

भाजपमध्ये चमकोगिरी करणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी चांगलाच दम भरला. शिवार संवाद अभियान आणि विस्तारक योजनेत सक्रिय राहणाऱ्या कार्यकर्त्यांनाच पुढे पक्षात अपेक्षित संधी मिळेल असेही त्यांनी सूचित केले. राम पॅलेसमधील भाजप कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी चमकोगिरी करणाऱ्यांना आपण भाजपचे कार्यकर्ते समजत नसल्याचे सांगितले. पक्षाचे काम समर्थपणे करणाऱ्या कार्यकर्त्यांना भाजपमध्ये ‘अच्छे दिन’ येतील, असा विश्वास देण्याचा प्रयत्न केला. दुय्यम दर्जाच्या वागणुकीमुळे आमदार गोटे यांच्या कार्यक्रमाकडे अनेक पदाधिकारी, लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवीत ते आणि पक्ष याबद्दलच्या आपल्या भावना अधोरेखित केल्याचे बोलले जाते. डॉ. भामरे यांच्याकडील बैठकीला मुख्यमंत्री स्वत: संबोधित करणार असतांनाही गोटे या बैठकीकडे  फिरकले नाहीत. यातून भाजपमधील दोन परस्पर विरोधी गटांची पक्ष निष्ठा मुख्यमंत्र्यांनी अनुभवली. मात्र याआधी झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांनी मंत्री रावल, डॉ. भामरे व आ. गोटे यांची जाहीर स्तुती करून मतभेदांवर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला. दोन्ही गटांच्या कार्यक्रमांना हजेरीच नव्हे तर, भरपूर वेळ देत उभयतांचे समाधान करण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला.