माजी खासदार व भाजप नेते भास्करराव खतगावकर यांच्या जि.प.सदस्य असलेल्या स्नुषा डॉ.मीनल खतगावकर यांची वर्णी भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीवर लावण्यात आल्यानंतर गेल्या अडीच-तीन वर्षांत काँग्रेस पक्षातून भाजपत आलेल्या जिल्ह्यातील नेत्यांनी या पक्षातही काँग्रेसी घराणेशाहीची प्रथा-परंपरा फुलविली असल्याची बाब चर्चेत आली आहे. या साऱ्या प्रयोगांमुळे जुने व जाणते भाजपचे नेते मागे पडले असून, नव्याने पक्षात आलेल्यांची चलती आहे.

खतगावकर यांच्या भाजप प्रवेशास येत्या सप्टेंबर महिन्यात तीन वष्रे पूर्ण होतील. या काळात त्यांनी अनेकांना बोट धरुन भाजपत आणले त्यात प्रामुख्याने मुखेड-देगलूर-बिलोली तालुक्यांतील राठोड परिवार, अविनाश घाटे, श्रीराम पाटील राजूरकर, व्यंकटराव गोजेगावकर, बळवंतराव बेटमोगरेकर, यादवराव तुडमे आदींचा उल्लेख करता येईल. वर्षभरानंतर नांदेड शहरातील काँग्रेसचे माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनीही भाजपत उडी मारली.

या आणि अन्य दिग्गजांच्या भाजप प्रवेशामुळे नांदेड जिल्ह्यातील अशोक चव्हाण हे एकमेव नेते काँग्रेस पक्षात राहिले. खतगावकरांच्या काँग्रेस त्यागाचा विधानसभा निवडणुकीत भाजपला अजिबात लाभ झाला नाही. मुखेड मतदारसंघात गोवद राठोड हे खरे तर स्वबळावर निवडून आले. त्यांना भाजपचा टीळा लागला पण त्यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या मुलाच्या माध्यमातून भाजपने ही जागा राखली. तेथून सुरु झालेली घराणेशाही आता आणखीनच फुलली आहे.

राठोड परिवाराने काँग्रेसमध्ये घराणेशाहीचे राजकारण केले. आता भाजपत त्यांनी तोच परिपाठ कायम राखला. भास्करराव हे स्वत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष, त्यांचा पुतण्या भाजयु मोर्चाचा जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी. खतगावकरांनी सुनेला जि.प.त निवडून आणण्यासाठी सारी शक्ती, संपूर्ण वेळ त्या एकाच मतदारसंघात घालविला. परिणामी त्यांच्या बिलोली तालुक्यात अन्य दोन जागा भाजपने गमविल्या. गोजेगावकरांनी आपल्या सुनेला निवडून आणले पण पक्षाच्या आणखी जागा या नेत्यांना वाढवता आल्या नाहीत. परिणामी या पक्षाला जिल्हा परिषदेत विरोधी बाकावर बसावे लागले.

नगरपालिका निवडणुकीत देगलूरमध्ये भाजपचा दारुण पराभव झाला तर बिलोलीत खतगावकरांनी भाजपच्या चिन्हावर उमेदवार उभे न करता काँग्रेस विरोधात आघाडी केली. अध्यक्षपदाचा उमेदवार देताना यादवराव तुडमे यांच्या माध्यमातून घराणेशाहीचा झेंडा फडकविण्यात आला.  तेथे शेवटी काँग्रेसचा तिरंगा फडकला. मुखेडमध्ये राठोड परिवाराची घराणेशाही अव्हेरत मतदारांनी गंगाधर राठोड यांना नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत पराभूत केले.

काँग्रेसमधून भाजपत आलेल्या नेत्यांना स्थानिक निवडणुकांत बहुसंख्य ठिकाणी दणके बसल्यानंतर भाजपने आता बाजार समित्या, सेवा सहकारी सोसायट्या अशा संस्थावर प्रशासकीय मंडळे आणून आपली पाठ थोपटून घेतली. जिल्हा बँकेत खतगावकरांनी स्वतऐवजी एखाद्या नव्या कार्यकर्त्यांस संचालक होण्याची संधी दिली नाही. मग त्यांचाच कित्ता माजी आमदार गंगाराम ठक्करवाड, राठोड परिवार यांनीही गिरवला. भाजपत जाण्याच्या मानसिकतेतले आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनीही ‘कुटुंब रंगलंय राजकीय पदांत’ हा प्रयोग शिवसेनेत राबविला आहे.

काँग्रेसजनांच्या मांदियाळीमुळे जिल्ह्यातील भाजप कागदोपत्री बलवान झाला आहे. मागच्या तीन वर्षांचा राजकीय ताळेबंद पाहिला तर नवनेत्यांमुळे भाजपला काहीच लाभ झाला नाही. भाजपमुळे हे नेते सर्व अंगांनी लाभार्थी झाले. जिल्हा बँकेतल्या मागील काळातील भानगडींतून यातील अनेकांची सुटका झाली. पदाचा आणि पूर्वीच्या प्रभावाचा वापर करुन या नेत्यांनी मंत्र्यांकडून करुन घेतलेल्या कामांची यादी तर फार मोठी;पण जिल्ह्यातील रखडलेले प्रकल्प, विभागीय आयुक्तालय, रेल्वे प्रश्न अशा लोकहिताच्या विषयांत खतगावकर, पोकर्णा, आ.राठोड प्रभृतींनी मुख्यमंत्र्यांना आग्रह करुन कधी बठक घ्यायला भाग पाडले नाही किंवा कधी केंद्रीय मंत्र्यांकडे जाऊन डोळे वटारले नाहीत. राज्य सरकारला काही महिन्यांनी तीन वर्ष पूर्ण होतील. ज्यांनी जिल्ह्यातील भाजपची ज्योत वर्षांनुवष्रे तेवत ठेवली ते सारे जुने पक्षात निर्वासित झाले. महत्त्वाच्या पदांवर व निर्णय प्रक्रियेत पक्षात नव्याने आलेल्यांचा वरचष्मा आहे तेच आता प्रस्थापित झाले आहेत. अशा निष्प्रभ, अपयशी नवनेत्यांना सोबत घेऊन भाजपला नांदेड मनपाच्या आगामी रणसंग्रामात खा.अशोक चव्हाण व त्यांच्या पक्षाशी मुकाबला करायचा आहे.

स्मारक समितीतही घराणेशाही

दिवंगत आमदार गोविंद राठोड यांच्या स्मारकाच्या निर्णयावर मधल्या काळात बरीच टीका झाली होती. राज्यशासनाने स्मारकाच्या उभारणीसाठी पूर्वीच्या शासन निर्णयानुसार एक समिती स्थापन केली असून या समितीवरही घराणेशाहीचा वरचष्मा आहे. माजी आमदार किशन राठोड, विद्यमान आमदार तुषार राठोड यांच्यासह सौ.ज्योत्स्ना तुषार राठोड, गंगाधर गोविंद राठोड व संतोष राठोड अशा राठोड परिवारातील पाच जणांचा समावेश आहे.