सांगली लोकसभा मतदारसंघातील विजय, जिल्ह्य़ात चार आमदार, नगरपालिका निवडणुकीत चांगले यश व यापाठोपाठ जिल्हा परिषदेची सत्ता, भाजपच्या यशाची कमान सांगली जिल्ह्य़ात वर जाणारी आहे. या यशाने भाजपच्या कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असून, सांगली महानगरपालिकेच्या सत्तेचे वेध लागले आहेत. पण निष्ठावान आणि अन्य पक्षांतून आलेले, अशी भाजपमध्ये उभे विभाजन झाले आहे. आयारामांपेक्षा निष्ठावतांना सत्तेची ऊब हवी आहे.

महापालिकेची मुदत संपण्यास अद्याप एक वर्षांचा अवधी असला तरी सत्तेची गणिते मांडण्याचे काम सुरू झाले आहे. जिल्हा परिषदेतून राष्ट्रवादीला हद्दपार केल्यानंतर एकमेव सत्तास्थान हाती उरलेल्या काँग्रेसलाही सत्तेपासून दूर करण्याचे मनसुबे भाजपाने रचले आहेत. एकहाती मिळाली नाही तर काँग्रेसपासून बाजूला जाऊ इच्छिणाऱ्यांची मदत घेता येईल, असा होरा सध्या असला तरी गणिते जमवत असताना आयारामांनाही संधी हवी असल्याने हा वाद आतापासूनच धुमसू लागला आहे.

काँग्रेसचा गेल्या चार वर्षांचा कारभार हा समाधानकारक नसल्याने सांगलीकर पर्यायांच्या शोधात आहेत. गेल्या वेळी हे ओळखूनच राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांनी महाआघाडीचा खेळ मांडला होता. काँग्रेसला बाजूला सारून राष्ट्रवादीप्रणीत विकास महाआघाडीने सत्ताही काबीज केली. मात्र त्या वेळी झेंडे बदलले तरी माणसे तीच होती. जनता दल, भाजपलाही महाआघाडीत सहभागी करून घेतले होते. यामुळे सत्तेची फळे काही प्रमाणात भाजपलाही मिळाली आहेत.

काँग्रेसला सत्ता मिळाली असली तरी प्रभावशाली कोणतेच काम गेल्या चार वर्षांत झाले नाही. विरोधकाच्या भूमिकेत असलेल्या राष्ट्रवादीने सत्तेसाठी सोयरीक केली, मात्र ही सोयरीक काँग्रेसमधील गटबाजीला प्रोत्साहित करणारी ठरली. काँग्रेसअंतर्गत असलेल्या मदन पाटील गटाचे नेतृत्व महापौर शिकलगार करीत असले तरी उपमहापौर विजय घाडगे हे शेखर माने यांच्या नेतृत्वाखाली विरोधकाची भूमिका बजावत आहेत.

दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीतही मोडतोड होण्याची लक्षणे दिसत आहेत. नगरसेवक संजय बजाज यांची कोंडी करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीतूनच सुरू असून याला बहुसंख्य नगरसेवकांची साथ लाभत आहे. विधानसभा क्षेत्राध्यक्ष कमलाकर पाटील यांच्याकडे बंडाचे नेतृत्व असलेल्या या गटाने आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निश्चय व्यक्त केला असला तरी अंतर्गत कुरघोडय़ा काँग्रेससारख्याच सुरू आहेत.

काँग्रेस व राष्ट्रवादी महापालिका निवडणुका एकत्र लढणार असल्याचे डॉ. पतंगराव कदम आणि आ. जयंत पाटील यांनी सांगितले असले तरी दोन्ही पक्षांत निर्माण झालेली बेदिली कमी करण्याचे प्रयत्न होताना दिसत नाही.

सत्तेतून पायउतार होण्याची चिन्हे दिसत असताना काही मंडळी भाजपच्या वळचणीला जाण्याच्या प्रयत्नात होती व आजही आहेत. यासाठी एका आमदारांनी तशी तयारीही केली होती. या पक्षप्रवेशासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगली दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र याची कुणकुण लागताच निष्ठावंत गटाकडून खो घालण्यात आला. पक्षात प्रवेश देत असताना बदनाम झालेल्यांना स्थान असणार नाही अशी स्पष्ट भूमिका शहर जिल्हाध्यक्ष आमदार सुधीर गाडगीळ यांनी जाहीर केल्याने आयारामांचा पक्षप्रवेश थांबला असला तरी ही तात्पुरती मलमपट्टी म्हणावी लागणार आहे.

दुसऱ्या बाजूला भाजपची दारे बंद केल्याने अस्वस्थ झालेल्यांनी पुन्हा एकदा मिरज पॅटर्नची टिमकी सुरू केली असून आमच्यासेबत १२ नगरसेवक असल्याचा दावा केला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि भाजपपासून अंतर राखून मदानात उतरण्याची तयारी या पॅटर्नमधून केली जात असली तरी निवडणूक निकालानंतर पुन्हा सत्तेत वाटा मिळविण्याचा प्रयत्न यामागे आहे.

भाजपकडून महापालिका निवडणुकीची मोच्रेबांधणी सुरू असून आमदार गाडगीळ हे शहर जिल्हाध्यक्ष असले तरी खरी सूत्रे शेखर इनामदार, नीता केळकर, मकरंद देशपांडे या निष्ठावंत गटाकडेच राहतील अशी तजवीज सुरू आहे. बाहेरच्या वर्तुळात माजी आमदार दिनकर पाटील, मुन्ना कुरणे आदींना स्थान असून आयारामांचा बंदोबस्त मदानापूर्वीच करण्याचे मनसुबे आखले जात आहेत.

बाहेरच्यांनारोखण्याचा प्रयत्न

सत्तेतून पायउतार होण्याची चिन्हे दिसत असताना काही मंडळी भाजपच्या वळचणीला जाण्याच्या प्रयत्नात होती व आजही आहेत. यासाठी एका आमदारांनी तशी तयारीही केली होती. या पक्षप्रवेशासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगली दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र याची कुणकुण लागताच निष्ठावंत गटाकडून खो घालण्यात आला. पक्षात प्रवेश देत असताना बदनाम झालेल्यांना स्थान असणार नाही अशी स्पष्ट भूमिका शहर जिल्हाध्यक्ष आमदार सुधीर गाडगीळ यांनी जाहीर केल्याने आयारामांचा पक्षप्रवेश थांबला असला तरी ही तात्पुरती मलमपट्टी म्हणावी लागणार आहे. दुसऱ्या बाजूला भाजपची दारे बंद केल्याने अस्वस्थ झालेल्यांनी पुन्हा एकदा मिरज पॅटर्नची टिमकी सुरू केली असून आमच्यासेबत १२ नगरसेवक असल्याचा दावा केला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि भाजपपासून अंतर राखून मदानात उतरण्याची तयारी या पॅटर्नमधून केली जात असली तरी निवडणूक निकालानंतर पुन्हा सत्तेत वाटा मिळविण्याचा प्रयत्न यामागे आहे.