News Flash

शिवसेना नेतृत्वाचे दुर्लक्ष

निष्ठावंत व उपरे वादात रायगड जिल्ह्य़ात भाजपच्या ताकदीत वाढ

शिवसेना ( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

निष्ठावंत व उपरे वादात रायगड जिल्ह्य़ात भाजपच्या ताकदीत वाढ

रायगड जिल्ह्य़ातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाचा वाढता प्रभाव, आगामी काळात शिवसेनेसाठी अडचणीचा ठरणार आहे. उत्तर रायगडात पक्षांतर्गत गटबाजी रोखली नाही तर आगामी काळात याची मोठी किंमत शिवसेनेला चुकवावी लागण्याची शक्यता आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत रायगड जिल्ह्य़ातून दोन खासदार निवडून आले होते. मावळ मतदारसंघातून सेनेचे श्रीरंग बारणे तर रायगड मतदारसंघातून अनंत गीते विजयी झाले होते. विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढताना सेनेला महाडमधून भरत गोगावले आणि उरण मतदारसंघातून मनोहर भोईर निवडून आले होते. अलिबाग आणि श्रीवर्धन मतदारसंघात सेनेच्या उमेदवारांचा थोडक्यात पराभव झाला होता. शेकाप आणि राष्ट्रवादीचे वर्चस्व असणाऱ्या या जिल्ह्य़ात सेनेनी जवळपास सर्व मतदारसंघांत आपले अस्तित्व दाखवून दिले होते. नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीतही सेनेला चांगले यश मिळाले होते. मात्र आगामी काळात ही परिस्थिती कायम राहील की नाही याबाबत साशंकता आहे.

जिल्ह्य़ात भाजपाचा वाढता प्रभाव शिवसेनेसाठी आगामी काळात अडचणीचा ठरण्याची शक्यता आहे, गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने जिल्ह्य़ात आपले हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. पक्षसंघटना बांधणीवर विशेष लक्ष दिले आहे. वेगवेगळ्या पक्षांतील प्रस्थापितांना पक्षात सामावून घेऊन पक्षाची मोट बांधली आहे. याचे सकारात्मक परिणाम जिल्ह्य़ात नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दिसून आले आहे. पनवेल, उरण, कर्जत, खालापूर आणि पेणमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये पक्षाने आपले अस्तित्व सिद्ध केले आहे.

नगरपालिका निवडणुकीत उरणमध्ये भाजपने स्वबळावर सत्ता स्थापन केली. खोपोली आणि पेण नगरपालिकेत भाजपचे नगरसेवक निवडून आले आहेत. यानंतर झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत पनवेल आणि उरण तालुक्यातून भाजपचे तीन सदस्य निवडून आले. एवढेच नव्हे तर नव्याने स्थापन झालेल्या पनवेल महानगरपालिकेत भाजपने एकहाती सत्ता मिळवत पनवेल मतदारसंघावर आपली पकड मजबूत झाल्याचे दाखवून दिले. उत्तर रायगडात शिवसेनेसाठी ही धोक्याची घंटा आहे. उत्तर रायगडात अध:पतनाची तसेच भाजप वाढण्यामागची कारणे तपासणे सेनेन गरजेचे आहे.

एकेकाळी कर्जत आणि खालापूर हा विभाग सेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र पक्षांतर्गत गटबाजी आणि वर्चस्ववाद यामुळे दोन्ही तालुक्यांत सेनेची वाताहत झाली आहे. पक्षात बाहेरून आलेले शिवसैनिक आणि एकनिष्ठ शिवसैनिक असे दोन गट सक्रिय आहेत. हे दोन्ही गट एकमेकांचे खच्चीकरण करण्यासाठी कार्यरत आहेत. याचा परिणाम निवडणूक निकालांवर होत आहे. असंतुष्ट गट आता भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. यामुळे सेनेच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये झालेला शिवसेनेला आलेले अपयश आणि दुसऱ्या बाजूला याच ठिकाणी भाजपच्या विजयाचा वाढणारा आलेख याचे सेना नेतृत्वाने चिंतन करण्याची गरज आहे. अन्यथा आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत याची मोठी किंमत सेनेला चुकवावी लागू शकते यात शंका नाही.

चुकांमधून बोध नाही

गेल्या विधानसभा निवडणुकीत महेंद्र थोरवे यांना तिकीट नाकारल्याने त्यांनी शेकापत प्रवेश करून निवडणुक लढवली होती. त्यांना ४५ हजार मते मिळाली होती. कर्जतमध्ये सेना उमेदवाराच्या पराभवाचे हे तात्कालिक कारण ठरले होते. महत्त्वाची बाब म्हणजे निवडणुकीनंतर थोरवे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश केला होता. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत कर्जत आणि खालापूर विभागात सेनेला मोठा फटका बसला होता. पनवेल आणि उरणमध्येही सेना सपशेल अपयशी ठरली. गटातटाच्या राजकारणामुळे सेनेचा पराभव झाल्याचे सांगितले गेले. पनवेल महानगरपालिका निवडणुकीत भाजपसोबत युती व्हावी यासाठी अनंत गीते अनुकूल होते. मात्र आदेश बांदेकरांनी त्याला विरोध केला. निकालात सेनेचा सुपडा साफ झाल्याचे दिसून आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2017 3:43 am

Web Title: internal dispute in shiv sena marathi articles part 3
Next Stories
1 वृक्षारोपणात यंदा चुका टाळणार का?
2 मीराकुमार बळीचा बकरा!
3 पोटच्या मुलांना जाळून मारणाऱ्या ‘त्या’ निर्दयी पित्याला अटक
Just Now!
X