गेल्या दोन महिन्यांपासून शहर आणि जिल्हाध्यक्षाविना चाचपडत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला चिखलदरा नगर परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसचे सरचिटणीस संजय खोडके यांच्या गटाने पुन्हा ‘दे धक्का’ केल्याने राष्ट्रवादीत अस्वस्थता पसरली आहे.
चिखलदरा या गिरीस्थानी असलेल्या नगरपालिकेत अडीच वर्षांपूर्वी पूर्ण बहुमतात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला या निवडणुकीत मात्र सत्ता गमवावी लागली. नगराध्यक्ष राजेंद्रसिंह सोमवंशी हे संजय खोडके यांच्या गटाचे मानले जातात. त्यांनी अपक्ष म्हणून दावेदारी उभी केली आणि काँग्रेसचे राजेश मांगलेकर यांचा पराभव केला. नगराध्यक्षपद शाबूत ठेवूनही झालेल्या सत्तांतराने बदलत्या राजकीय प्रवाहाचे संकेत दिले आहेत. संजय खोडके यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी बाहेर पडून स्वतंत्र झेंडा उभारला होता, पण विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सुलभा खोडके यांना बडनेरातून पराभव पत्करावा लागला, पण गटाची एकजूट कायम ठेवण्यात खोडके यांना यश मिळाले होते. अमरावती महापालिकेत काँग्रेसची आणि अप्रत्यक्षपणे खोडके गटाची सत्ता आहे. महापालिकेत राष्ट्रवादीचे अस्तित्व संकुचित बनलेले असताना आता जिल्हा पातळीवरही चढाओढीचे राजकारण सुरू झाले आहे. चिखलदरा नगर पालिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक त्याची निदर्शक ठरली आहे.
चिखलदरा नगर पालिकेत एकूण १७ सदस्य आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ९, काँग्रेसचे ६ आणि २ अपक्ष आहेत. गेले अडीच वष्रे सोमवंशी नगराध्यक्ष होते. खोडके समर्थक असलेल्या सोमवंशी यांनी राष्ट्रवादीला धक्का दिला. यावेळी तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्येही फूट पडली. काँग्रेसने राजेश मांगलेकर यांना उमेदवारी दिल्याने समीकरण बदलले. काँग्रेस नगरसेवकांनी प्रदेशाध्यक्षांकडे गळ घातली. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी जारी केलेल्या व्हीपलाही महत्व उरले नाही आणि ठरल्याप्रमाणे सोमवंशी नगराध्यक्षपदी निवडून आले. निवड होताच सोमवंशी यांनी मी काँग्रेसचाच, अशी घोषणा करून टाकली. यात काँग्रेसने मात्र विनाकारण आपले हसे करून घेतले. या निवडणुकीत काँग्रेसचा अधिकृतरीत्या पराभव झाला असला, तरी खोडके गटाचा विजय म्हणजे काँग्रेसचा विजय, हे आपोआप ध्वनित झाले आहे.
राष्ट्रवादीचे कागदोपत्री सर्वाधिक ९ सदस्य असताना त्यांना उपाध्यक्षपदही मिळू शकलेले नाही. उपाध्यक्षपदी रेश्मा परवीन शेख महबूब यांची पुन्हा निवड झाली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा एका मताने पराभव झाला असला, तरी या निवडणुकीने दोन्ही पक्षांना आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडले आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही चांगलीच अस्वस्थता आहे. खोडके यांच्या बंडाचे दुखणे कुठवर सहन करणार, असा प्रश्न राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना पडला आहे. गेल्या एप्रिलमध्ये राष्ट्रवादीच्या संघटनात्मक निवडणुका झाल्या. एप्रिलअखेर शहर व जिल्हाध्यक्षांच्या निवडीची घोषणा अपेक्षित होती, पण अजूनही राष्ट्रवादीला घोषणेसाठी मुहूर्त सापडलेला नाही. कार्यकर्त्यांना संपर्क नेत्याचाच आधार आहे. जुने पदाधिकारी काळजीवाहू म्हणून काम पाहत आहेत. आमदार रवी राणा हे राष्ट्रवादीच्या निकट असले, तरी त्यांना स्वत:ची संघटना अधिक जवळची आहे. आता पुन्हा पुन्हा हादरे बसत असताना राष्ट्रवादीचे स्थानिक नेते चांगलेच अस्वस्थ झाले आहेत.