लातूरमध्ये पालकमंत्र्यांच्या विरोधकाच्या कार्यक्रमाला खासदारांची उपस्थिती

गेल्या काही महिन्यांपासून पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर व खासदार डॉ. सुनील गायकवाड या भाजपच्या दोन नेत्यांमधील मतभेद दिवसेंदिवस वाढतच असल्यामुळे मतभेदाची दरी दररोज खोल खोल होत चालली आहे. त्यातूनच खासदार गायकवाड यांना पुन्हा उमेदवारी मिळणार का, जर उमेदवारी मिळाली तर पालकमंत्री त्यांचे काम करणार का, या चच्रेला आतापासूनच ऊत आला आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या लातूर जिल्हय़ाच्या गडाला सुरुंग लावत मोदी लाटेत खासदार डॉ. सुनील गायकवाड हे अडीच लाखांच्या मताधिक्क्याने विजयी झाले. त्यानंतर जिल्हय़ातील काँग्रेसचा गड कोसळण्यास सुरुवात झाली. विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, नगरपंचायत, महानगरपालिका, अशा सर्वच निवडणुकीत काँग्रेसची दाणादाण उडाली.

मरगळलेली काँग्रेस पुन्हा जोर धरेल का अशी स्थिती निर्माण झालेली असतानाच विदर्भात नाना पटोलेंनी बंडखोरीचे रणिशग फुंकले व त्यांनी काँग्रेस प्रवेश केला. त्यानंतर राज्यातील विविध मतदारसंघांत भाजपचे अंतर्गत मतभेद उफाळून येत आहेत. लातूरात खासदार डॉ. सुनील गायकवाड व पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्यातील मतभेद विकोपाला जात असल्याचे चित्र समोर येत आहे.

माध्यमांसमोर संभाजी पाटील निलंगेकर खासदारांच्या विरोधात एकही शब्द बोलत नसले तरी खासदार डॉ. सुनील गायकवाड हे गेल्या काही दिवसांपासून उघडपणे निलंगेकरांच्या विरोधात वक्तव्य करू लागल्यामुळे राजकीय चच्रेला ऊत येतो आहे. लातूर-मुंबई रेल्वे ही बीदपर्यंत वाढवण्याचा निर्णय झाल्यामुळे खासदार गायकवाड यांच्याबद्दल नाराजी पसरली होती. गायकवाडांनी व पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर या दोघांनी रेल्वेचा तिढा सोडवण्यासाठी प्रयत्न केला. नांदेडहून पनवेलला जाणारी आठवडय़ातून सहा दिवस रेल्वे सुरू झाली व फेब्रुवारीपासून लातूरहून आठवडय़ातून तीन दिवस बेंगळूरुपर्यंत रेल्वे सुरू झाली. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी यांनी बेंगळूरु रेल्वेचे श्रेय पालकमंत्र्यांना जाते असे पत्रक प्रसिद्ध केले त्यावर चिडलेल्या गायकवाड यांनी खासदार म्हणून आपण प्रयत्न केले आहेत याचे श्रेय लातूरमधील पत्रकार व आपल्याला असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले. नाव न घेता पालकमंत्र्यांच्या कार्यशैलीवर त्यांनी टीका केली. त्यानंतर पालकमंत्र्यांनी बेंगळूरु रेल्वे सुरू करण्याचे श्रेय लातूरकर जनतेला आहे कारण जनतेने ही मागणी केली होती अशी प्रतिक्रिया दिली व खासदारांच्या वक्तव्यावर टिप्पणी करण्याचे टाळले.

लातूर जिल्हय़ाचे शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख अभय साळुंके हे पालकमंत्र्यांचे कट्टर राजकीय विरोधक. त्यांनी शेतमालाच्या भावाच्या कारणावरून पालकमंत्र्यांच्या खुर्चीचा लिलाव केला अन् आपणच निलंगेकरांचे मतदारसंघातील प्रमुख विरोधक असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला. रविवारी अभय साळुंके यांच्या पानचिंचोली गावातील कार्यक्रमाला भाजप खासदार डॉ. सुनील गायकवाड उपस्थित राहिले. त्यांनी गावातील रस्ता सुशोभीकरण व लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन केले अन् हे गाव अतिशय चांगल्या गतीने प्रगती करत असून या गावाच्या विकासासाठी १० लाख रुपयांचा निधी त्यांनी जाहीर केला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने गायकवाड यांनी केलेले भाषण हे पालकमंत्र्यांना झोंबणारे ठरले.

गावाकडे येताना रस्ता पाहून आपण आपल्या चालकाला या भागाचा खासदार कोण आहे व मंत्री कोण आहे, असा प्रश्न विचारला तेव्हा चालकाने आपणच खासदार असल्याचे सांगितले. रस्ता खराब असल्यामुळे क्षणभर आपण या भागाचे खासदार आहोत हेही विसरून गेलो होतो असे गायकवाड यांनी जाहीर भाषणात सांगितले. स्वत:वर कोटी करत पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातील रस्ते चांगले नसल्याबद्दल टीका केली.

अभय साळुंके यांनी खासदारांचे काम किती चांगले आहे याचे गुणगाण आपल्या भाषणात केले. अभय साळुंके व सुनील गायकवाड यांची मत्री कायम राहील अशा मत्रीच्या आणाभाकाही घेण्यात आल्या. पानचिंचोलीतील कार्यक्रमावर अद्याप पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी उघडपणे कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही मात्र पालकमंत्री व खासदार यांच्यातील अंतर दिवसेंदिवस वाढत असल्याचे हे द्योतक आहे. खासदार गायकवाड हे आपण नितीन गडकरी यांचे पट्टशिष्य असल्याचे सांगत आहेत तर पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचेही नितीन गडकरी यांच्याशी अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत. खासदार व पालकमंत्री यांच्यातील तिढा सोडवण्यासाठी नितीन गडकरी पुढाकार घेणार का ,असा प्रश्न उपस्थित होत आहे तर भाजपतील या उकाळ्यापाकाळ्यामुळे मरणासन्न झालेल्या काँग्रेसमध्ये धुगधुगी निर्माण होते आहे.