तटकरे-भास्कर जाधव शीतयुद्ध; पक्षातील गटबाजी थांबेना

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे या पक्षाच्या दोन राज्य पातळीवरील नेत्यांच्या रत्नागिरी जिल्हादौऱ्याच्या निमित्ताने पक्षांतर्गत गट-तटाचे पुन्हा एकवार दर्शन घडवताना या पक्षाची धाव दापोली-चिपळूणपलीकडे जाणे जणू अशक्यच असल्याचे चित्र पुढे आले आहे.

खासदार सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिपळूण तालुक्यात सावर्डे येथे पक्षकार्यकर्त्यांचा ‘संवाद मेळावा’ आयोजित करण्यात आला होता, पण त्यामध्ये विसंवादी सूरच जास्त लागले. जिल्हा प्रभारी आमदार भास्कर जाधव यांनी या मेळाव्यात बोलताना, पक्षांतर्गत विविध समित्यांची पदे चिपळूणमध्ये एकवटली असल्याची तक्रार केली. या बोलण्याचा रोख आपल्यावर असल्याचे लक्षात आल्यामुळे पक्षाचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांनी जाधवांना तेथेच रोखण्याचा प्रयत्न केला. जाधव तेच तेच परत बोलत असल्याचा त्यांचा आक्षेप होता. पण त्यामुळे आवरते न घेता, मी बोलायला लागलो की तुम्ही अस्वस्थ का होता, असे निकमांना विचारत जाधवांनी दुहीचे जाहीर प्रदर्शन केले.

दापोली, रत्नागिरी, राजापूर इत्यादी तालुक्यांमधून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी मेळाव्यात मनोगत व्यक्त करताना, जाधवांकडे जास्त अधिकार देण्याची सूचना केली. त्यातून अप्रत्यक्षपणे निकमांवरच शरसंधान केले गेले. सुप्रियाताईंनी मात्र आपल्या भाषणात या विसंवादाचा थेट उल्लेख न करता, भांडय़ाला भांडे लागले की आवाज येतोच. आमच्याही जिल्ह्य़ात असेच आहे, असे म्हणत, येथे सर्व काही व्यवस्थित चालले आहे, असे चित्र निर्माण करू नका. कार्यकर्त्यांनी मनमोकळेपणाने बोललेच पाहिजे, असा तात्त्विक सूरही लावला. पक्षांतर्गत मतभेद मिटवण्यापेक्षा जिल्हा पातळीवरील सरदारांना परस्परांशी झुंजत ठेवण्याच्या पक्षनेतृत्वाच्या शैलीची झलक त्यातून पुन्हा एकवार प्रत्ययाला आली.

या संदर्भात नोंद घेण्यासारखी आणखी एक बाब म्हणजे, सर्व प्रमुख पक्ष फिरून आता पुन्हा काँग्रेसच्या रिकाम्या तंबूमध्ये दाखल होत असलेले चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम राष्ट्रवादीमध्ये होते तेव्हा त्यांनी आणि आमदार जाधवांनी एकमेकांना पक्षाबाहेरची वाट दाखवण्याचा विडा उचलला होता. त्या वेळी जाधवांनी निकमांशी जुळवून घेण्याचे धोरण ठेवले होते. त्या काळात या दोघांनी मिळून जिल्ह्य़ात एकत्र फिरून तालुकावार कार्यकर्ता शिबिरेही घेतली होती आणि त्यांना चांगला प्रतिसादही मिळाला होता.

सुमारे आठ महिन्यांपूर्वी कदम राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर आता जाधवांनी निकमांविरुद्ध आघाडी उघडल्याचे चित्र या मेळाव्यातून दिसले. त्यांच्या काही आक्षेपांमध्ये तथ्य असू शकते, पण ते मांडण्याचे स्थळ, वेळ आणि पद्धत हमखास संघर्षांला निमंत्रण देणारी असते. तेच येथे घडले आणि त्यामध्ये अजाणतेपणा निश्चितच नव्हता.

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी निकमांचे पूर्वीपासूनच गूळपीठ आहे, तर जाधव यांचे कायमच विळ्या-भोपळ्याचे सख्य राहिले आहे. केवळ राजकारणच नव्हे, तर चार वर्षांपूर्वी चिपळूणला झालेल्या साहित्य संमेलनाच्या निमित्तानेही त्याचा प्रत्यय आला होता. त्यामुळे गेल्या रविवारी तटकरे चिपळूण तालुक्याच्या दौऱ्यावर आले तेव्हा शिरगाव येथे आयोजित पक्षाच्या मेळाव्याला गैरहजर राहत आमदार जाधवांनी आपला जुना पीळ कायम असल्याचाच संदेश दिला. त्याचबरोबर मेळाव्यात आणखी काही स्थानिक पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती, तर काही उपस्थितांचा टाळण्यात आलेला नामोल्लेख, यामुळेही एकीकडे ग्रामपंचायत निवडणुकांमधील पक्षाच्या विजयी सरपंच-उपसरपंचांचे सत्कार होत असतानाच दुसरीकडे पक्षातील गटबाजीही उघड होत होती. हे चित्र लक्षात घेऊन वेळीच डागडुजी न केल्यास, गुहागर आणि चिपळूण या पक्षाची ताकद असलेल्या दोन्ही मतदारसंघांमध्ये २०१९च्या विधानसभा निवडणुकीत दगाफटका होऊ शकतो.

आगामी सार्वत्रिक निवडणुका जेमतेम दीड-दोन वर्षांवर आल्या असताना राष्ट्रवादीमधील हे चित्र फार सुखद निश्चितच नाही. संगमेश्वर हा सेनेचा पूर्वीपासूनच बालेकिल्ला राहिला आहे. त्याचबरोबर, मागील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करून निवडणूक जिंकल्यानंतर राष्ट्रवादीला जिल्ह्य़ाच्या दक्षिण भागामध्ये जणू अघोषित प्रवेशबंदीच झाली आहे. लांजा-राजापूरमध्ये सेनेचे आमदार राजन साळवी (प्रसंगी सामंतांशी दोन हात करत) नेटाने उभे आहेत. या उलट, जिल्ह्य़ाच्या उत्तर भागामध्ये दापोली आणि गुहागर मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार असले तरी चिपळूणमध्ये सेनेचे आमदार सदानंद चव्हाण आणि खेडमध्ये रामदास कदम यांनी चिरंजीव योगेश यांच्यासह सेनेचा गड शाबूत ठेवला आहे.

या पाश्र्वभूमीवर, राष्ट्रवादीच्या जिल्हा पातळीवरील नेत्यांमध्ये अशा प्रकारे संघर्षांच्या ठिणग्या वाढत गेल्या तर २०१९ नंतर याही जिल्ह्य़ात पक्षाची सिंधुदुर्गासारखी अवस्था होईल आणि जाधव-निकम ओढून ताणून एकत्र राहिले तरी पक्षाची धाव चिपळूणपलीकडे जाणार नाही, हेच या ‘संवाद मेळाव्या’तून अधोरेखित झाले.