भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांना राजकारणात शह देण्यासाठी ज्येष्ठ नेत्या आमदार शोभा फडणवीस विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सक्रिय झाल्या आहेत. त्यांनी पथकर विरोधी आंदोलन तसेच वाघाला गोळय़ा घालण्याच्या आदेशासाठी वजन खर्ची केले. आता बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातही त्या अनेक उपक्रम राबवित आहेत.

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे, रिपाइं व बसपा असे सर्वपक्षीय नेते सक्रिय झाले आहेत. भाजपमध्ये विधान परिषदेच्या आमदार शोभा फडणवीस या सुध्दा अचानक सक्रिय झाल्या आहेत. केवळ माजी प्रदेशाध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांना राजकारणात शह देण्यासाठीच त्या सक्रिय झाल्याची चर्चा बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात सुरू आहे. त्यातूनच त्यांनी ताडाळी पथकर नाक्याचा मुद्दा उचलून धरला.
बारा वर्षांनंतर त्यांना अचानक लोकांच्या समस्यांची आठवण झाली आणि त्यांनी यासाठी ठिय्या आंदोलन सुध्दा केले. तसेच बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या पोंभूर्णा येथील धुमाकूळ घालणाऱ्या वाघाचा प्रश्न सुध्दा लावून धरला. प्रसंगी या वाघाला ठार करावे ही मागणी लावून धरली तसेच गोळय़ा घालण्याच्या आदेशासाठी राजकीय दबाव व वजन सुध्दा खर्ची केले. ताईंचे अचानक सक्रिय होणे म्हणजे मुनगंटीवारांना शह देऊन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पदरात काहीतरी लाभाचे पद पाडून घेणे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरू आहे. त्याला कारण फडणवीस या पाच वष्रे शांत असतात आणि निवडणुका आल्या की त्यांना आंदोलन, जनतेच्या प्रश्नांची आठवण होते. आताही तसाच प्रकार सुरू असून या माध्यमातून त्या बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातसुध्दा अचानक सक्रिय झाल्या आहेत.
विशेष म्हणजे बल्लारपूर विधानसभा मतदारसंघ सुरुवातीला मूल-सावली विधानसभा मतदारसंघात होते. याच मतदारसंघातून फडणवीस या सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आल्या. गेल्यावर्षी मतदार संघाच्या पुनर्रचनेत मूल-सावली मतदारसंघाचे विभाजन होऊन बल्लारपूर हा नवीन मतदारसंघ तयार झाला. मूल सावली मतदारसंघातील काही बहुतांश भाग बल्लारपूर मतदारसंघात व उर्वरित भाग हा ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात गेला. गेल्या निवडणकीत आमदार मुनगंटीवार यांनी फडणवीस यांचा पत्ता कट केला आणि स्वत: प्रचंड मताधिक्क्याने येथून विजयी झाले. स्वत:चा मतदारसंघ मुनगंटीवारांनी बळकावल्याचे शल्य ताईंच्या मनात आहे.
आता निवडणुकीच्या तोडावर पुन्हा एकदा सक्रिय होऊन त्यांनी राजकीय लाभ पदरी पाडून घेण्याची तयारी सुरू केली आहे. त्यांच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा कार्यकाळ संपण्यासाठी आणखी एक वर्षांचा कालावधी आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सक्रिय व्हायचे आणि पदरी लाभ पाडून घेतल्यानंतर शांत व्हायचे अशी त्यांची राजकीय खेळी आहे. त्याच दृष्टीने ताईंचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे.