इंडोनिशियात झालेल्या बुद्धीबळ स्पर्धेत आंतरराष्ट्रीय बुद्धीबळपटू ऋचा पुजारीने ११ फेऱ्यांमध्ये ७ गुण पटकावात महिला ग्रँडमास्टर (WGM)हा नॉर्म प्राप्त केला. ११ ते २१ जून या कालावधीत निमंत्रितांच्या राऊंड रॉबिन स्पर्धेत तिने हे यश मिळवले. ग्रॅडमास्टरचा नॉर्म मिळवण्यासाठी तीन नॉर्म आवश्यक असतात. ऋचा पुजारीला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
जागतिक बुद्धीबळ महासंघाच्या मान्यतेने व इंडोनेशियन चेस फेडरशनेच्यावतीने याचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत फ्रान्स, जॉर्जिया, भारत, रोमानिया, सिंगापूर व व्हिएतनाम या देशातून प्रत्येक एक व इंडोनेशियातील सहा अशा १२ खेळाडूंना आमंत्रित केले होते.

भारतातून एकमेव ऋचा पुजारीला आमंत्रित केले होते. इंडोनेशियातील योगर्टा या शहरातील ग्रँड इन्ना मॅलिओनेरो या पंचतारांकित हॉटेलमध्ये ही स्पर्धा झाली.  या १२ खेळाडूंच्या राऊंड रॉबिन स्पर्धेमध्ये प्रत्येकाने प्रत्येकाबरोबर खेळायचे असते. महिला ग्रॅडमास्टरचा नॉर्म मिळवण्यासाठी नऊ फेऱ्यांमध्ये कमीत कमी ६.५ गुण होणे गरजेचे असते. तसेच आपला रेटींग परफॉर्मन्स २४०० च्या पुढे असवा लागतो. ऋचाने आठव्या फेरीतच ६.५ गुणांची कमाई करत महिला ग्रँडमास्टरच्या पहिल्या नॉर्मवर शिक्कामोर्तब केले.

पहिल्या फेरीत व्हिएतनामची महिला आंतरराष्ट्रीय मास्टर लुआंगकडून ऋचाला पराभव पत्करावा लागला. त्यानंतर मात्र तिने स्वतःला सावरत सलग सहा डावात विजय व एका डावात बरोबरी करत आठ फेऱ्यांत ६.५ गुण पटकावले. फ्रान्स, सिंगापूर व इंडोनिशियातील दिग्गज खेळाडूंचा पराभव केला. या यशामुळे तिने ३४ आंतरराष्ट्रीय गुणांची कमाई केली. तिचे रेटींग २२६८ झाले आहे. ग्रँडमास्टरसाठी २३०० रेटींग असणे गरजेचे आहे. पुढील महिन्यात चीन आणि ऑगस्ट महिन्यात अबुधाबी येथे ग्रँडमास्टर्स स्पर्धेत ती आता सहभागी होणार आहे.