News Flash

औरंगाबाद विमानतळास आंतरराष्ट्रीय दर्जा

पर्यटनाची राजधानी असणाऱ्या औरंगाबाद शहरातील विमानतळास आंतरराष्ट्रीय दर्जा देण्याची अधिसूचना केंद्रीय अबकारी विभाग व सीमाशुल्कचे आयुक्त कुमार संतोष यांनी सोमवारी जारी केली.

| February 24, 2015 01:30 am

पर्यटनाची राजधानी असणाऱ्या औरंगाबाद शहरातील विमानतळास आंतरराष्ट्रीय दर्जा देण्याची अधिसूचना केंद्रीय अबकारी विभाग व सीमाशुल्कचे आयुक्त कुमार संतोष यांनी सोमवारी जारी केली. या अधिसूचनेनंतर दुबई फ्लाय, बँकॉक एअरवेज व फ्रीडम एअरवेज या तीन विमान कंपन्यांची उड्डाणे औरंगाबाद विमानतळावरून होऊ शकतात. या बरोबरच आंतरराष्ट्रीय पातळीवरील सामानांची ने-आण करण्याची परवानगीही या अधिसूचनेमुळे मिळाली आहे. औरंगाबादच्या आर्थिक उलाढालीला वेग देणारी ही घटना असल्याने त्याचे औद्योगिक जगतात स्वागत होत आहे.
शहरातील चिकलठाणा विमानतळावरून औषधी कंपन्यांशी संबंधित मालाची ने-आण आधी मुंबईला केली जायची आणि तेथून पुढे माल पाठविण्यासाठी एजंट लागत असे. अधिक रक्कमही खर्च होत असे. सुमारे १ हजार ६०० कोटींची उलाढाल निर्यातीच्या क्षेत्रात होत असल्याने या नव्या सुविधेचा चांगला लाभ होईल, असे मत सीएमआयएचे अध्यक्ष मुनीष शर्मा यांनी सांगितले.
फ्लाय दुबई या विमान कंपनीने औरंगाबाद ते दुबई अशी आठवडय़ातून चार वेळा उड्डाणे करण्याचा प्रस्ताव हवाई वाहतूक मंत्रालयास पाठविला आहे. त्याचबरोबर बँकॉक एअरवेजने औरंगाबाद ते बँकॉक आणि दुबई व शारजा येथेही उड्डाणे करण्यास इच्छुक असल्याचे कळविले आहे. मात्र, या नव्या सुविधेचा लाभ केशर आंबा उत्पादकांना मोठय़ा प्रमाणात होऊ शकतो. मका या पिकास प्रोत्साहन मिळावे म्हणून आघाडी सरकारने दिलेली आश्वासने काही काळ रखडली होती, ती आता पूर्णत्वास आल्याने आर्थिक उलाढालीचा वेग वाढू शकेल, असे उद्योजकांना वाटते.
दरम्यान, जेव्हा आंतरराष्ट्रीय विमानांची ये-जा होईल तेव्हा कस्टमचे उपसंचालक दर्जाचे अधिकारी, अधीक्षक दर्जाचे ४-५ अधिकारी, तेवढेच निरीक्षक, इमिग्रेशन, स्वाईन फ्लू सुरू असल्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक विमानतळावर तैनात केले जाईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2015 1:30 am

Web Title: international rank to aurangabad airport
टॅग : Aurangabad
Next Stories
1 निरंजन भाकरे यांचा विश्वविक्रम
2 कट्टर दहशतवाद्याला नांदेडमधून बनावट आधारकार्ड!
3 कोल्हापूरमध्ये बंदमुळे सर्वत्र शुकशुकाट
Just Now!
X