मध्यप्रदेशच्या तुलनेत महाराष्ट्रातील वाघिणीची जंगलात सरावण्याची क्षमता अधिक असतानासुद्धा एका अभिमानास्पद प्रयोगाला महाराष्ट्र मुकला आहे. मध्यप्रदेशच्या वनखात्याने बंदिवासातील वाघिणीला जंगलात सोडण्याचे धाडस दाखवून हा प्रयोगही यशस्वी केला, तर त्याच वेळी महाराष्ट्राच्या वनखात्याने प्रयोगच अध्र्यावर सोडून माघार घेतली. त्यामुळे तब्बल सहा वर्षांपासून पिंजऱ्यात असलेल्या ‘त्या’ वाघिणीला स्वातंत्र्याआधीच पुन्हा बंदिवास घडला आहे.
फसलेला प्रयोग
चंद्रपूर जिल्ह्य़ातील धाबा वनपरिक्षेत्रात वाघिणीच्या शिकारीनंतर तिच्या तीन बछडय़ांना बोर अभयारण्यातील पिंजऱ्यात स्थानांतरित करण्यात आले. बछडय़ांना पिंजऱ्यात न ठेवता जंगलात सोडण्याच्या दृष्टीने त्यांचे पालनपोषण करण्यात आले. सुरुवातीला बोर अभयारण्यात आणि नंतर गेल्या साडेतीन वर्षांंपासून पेंच व्याघ्र प्रकल्पातील खुल्या पिंजऱ्यात त्यांना शिकारीचे प्रशिक्षण देण्यात आले. भारतीय वन्यजीव संस्थानचे वरिष्ठ वैज्ञानिक श्री. रमेश आणि सोबतच पराग निगम यांनीही या वाघिणीच्या सक्षमतेचे प्रमाणपत्र दिले. यातील एका वाघिणीला ‘रेडिओ कॉलर’ लावून जंगलात सोडण्याची वेळ आली तेव्हा पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची नकारात्मक भूमिका आड आली. वाघीण स्वत:हून शिकार करू शकत नाही, असे प्रमाणपत्र देत जंगलात सोडलेल्या वाघिणीला तिच्या मुळ अधिवासात सरावण्याआधीच पिंजऱ्यात परत घेण्यात आले.
मध्यप्रदेशात यश
मध्यप्रदेशातील पन्हा व्याघ्र प्रकल्पात दोन वाघिणीसंदर्भात असाच प्रयोग राबवण्ला.  पहिल्या वाघिणीला तीन महिने शिकार करता न आल्याने तिला सुरुवातीला शिकार पुरवावी लागली, पण त्यानंतर ती शिकारीला सरावली. दुसऱ्या वाघिणीने मात्र जंगलात मुक्तता झाल्याबरोबर शिकारीला सुरुवात केली.

वाघांच्या बाबतीत संवेदनशील असलेल्या मध्यप्रदेशच्या वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी त्याच बळावर हा प्रयोग करण्याचे धाडस दाखवून तो यशस्वीही केला. मात्र, त्याच वेळी महाराष्ट्र वनखात्याची नकारात्मकचा भोवली आणि वाघांच्या बाबतीतला अभिमानास्पद प्रयोग महाराष्ट्राऐवजी मध्यप्रदेशच्या नावावर गेला.