20 September 2018

News Flash

International Women’s Day 2018 कचऱ्यातले बाईपण..!; एखादी सुजाताताई सावरणारी…

शहर जेव्हा गाढ झोपेत असते तेव्हा सुजाताताई पवार घर सोडतात.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

शहर जेव्हा गाढ झोपेत असते तेव्हा सुजाताताई पवार घर सोडतात. कचरावेचक म्हणून गेली २० वष्रे काम करणारी ३०वर्षांची ही महिला कमावते मात्र चांगले. म्हणजे दिवसाला भंगार विक्रीतून बाराशे ते तेराशे रुपये. नवरा दारुडा. सोडून गेला एकेदिवशी. घराचा गाडा एकटय़ाच्या जीवावर ओढणाऱ्या सुजाताताईनी आता स्वत:चे घर बांधले आहे. संसाराचा गाडा ओढायचा तर कष्ट करावेच लागतील,हे त्यांना परिस्थितीने शिकविले. त्यांचा मुलगा दीपक अणि मुलगी पार्वती आता शिकते आहे. त्यांचे म्हणणे एवढेच,‘ मुलांचे आयुष्य कचऱ्यात जायला नको!’

HOT DEALS
  • Sony Xperia XZs G8232 64 GB (Warm Silver)
    ₹ 34999 MRP ₹ 51990 -33%
    ₹3500 Cashback
  • Vivo V7+ 64 GB (Gold)
    ₹ 16990 MRP ₹ 22990 -26%
    ₹900 Cashback

सुजातासारखे काम करणाऱ्या औरंगाबादसारख्या शहरात किमान दोन हजाराहून अधिक महिला असतील. कचरा वेचण्याच्या या कामात महिलांची संख्या मोठी. जणू हे काम फक्त महिलांचेच. पण जोपर्यंत महिलांचे काम तोपर्यंत हे क्षेत्र असंघटित. कचरा क्षेत्रात काम करणाऱ्या नताशा झरीन सांगत होत्या,‘ आपल्याकडे कचरा काढण्यापासून ते कचऱ्याच्या गाडीत तो टाकेपर्यंतची सारी कामे महिलाच करतात. असे का?- कारण आपल्याकडे कोणती कामे कोणी करावीत, याचे नकळत संस्कार झालेले असतात’ घरात कोणी पुरुष झाडू घेणारा असेल तर त्याला नावे ठेवणारी मंडळी कुटुंबातच असतात. त्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांकडे माणुसकीच्या दृष्टीतून कोणी पाहत नाही. लिंगभेदभावाचे मूळ अगदी कचऱ्यासारख्या समस्येतही मोठय़ा प्रमाणात दिसते. घर झाडून- पुसून स्वच्छ केले की कचरा टाकणाऱ्या घंटागाडीपर्यंत जाणारे पुरुषही तसे कमीच.

कचरा घरातून घंटागाडीपर्यंत किंवा कचराकुंडीपर्यंत आला की एक मोठा वर्ग या कचऱ्यावर जगत असतो. त्याचे एक मोठे अर्थकारण आहे. सुजाताताई या साखळीचा एक भाग. खपटे, प्लास्टिकच्या पिशव्या, पुठ्ठे, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, चपलांचे तळवे, मद्याच्या आणि बिअरच्या बाटल्या भंगारात विकून पोट भरणाऱ्या या क्षेत्रातील महिलांचे क्षेत्र तसे असंघटित. या क्षेत्रातील संघटितपणा सुरू होतो जेव्हा कचरा पुरुषाच्या हातात येतो तेव्हा. गौरी मिराशी या औरंगाबादच्या कचरा व्यवस्थापनामध्ये अनेक दिवसापासून काम करणाऱ्या कार्यकर्त्यां. त्या सांगत होत्या, कचऱ्याची गाडी हाकण्यापासून ते भंगाराचा भाव ठरवेपर्यंत सारे क्षेत्र पुरुषांचे आहे. अगदी क्षेपणभूमीपर्यंत कचरा आणण्याच्या सगळया सुविधा सुरू झाल्या की त्यात पुरुषाची मक्तेदारी सुरू होते. औरंगाबादसारखे कचऱ्याचे प्रश्न सोडावायला हाती घेतले की, धोरणात्मक निर्णय घेतानाही त्यात महिलांच्या अंगाने फारसा कोणी विचार करीत नाही.’ सुजाता पवारला असल्या जाणिवांशी तसे काही देणेघेणे नाही. तिला फक्त तिची मुले जगवायची आहेत. म्हणूनच ती सकाळी पाच वाजता घर सोडते. बहुतांश महिला काम करणाऱ्या क्षेत्रात असल्याने अलिकडे काही ना काही जाणिवा वाढू लागल्या आहेत. पण या क्षेत्रात कोणी काही विचार करण्याची शक्यताच नाही. कारण औरंगाबादसारख्या ठिकाणी २० लाख मेट्रिक टनाचा कचरा साठविण्यात आलेला आहे. त्याचा एक मोठा डोंगर आहे. त्यात कोण विचार करेल कोणता कचरा कसा वेगळा ठेवावा? कचऱ्यात सॅनिटरी नॅपकीन, कॉन्डोमसारख्या वस्तू नेहमी येणाऱ्या. पण त्याची विल्हेवाट लावण्याची तशी सोय नसल्याने कचरावेचक महिलांना हे दिव्य उचलून टाकण्याचे काम करावेच लागते. कचरावेचकाच्या दुनियेत एक हजार महिलामांगे फारतर शंभर पुरुष असतील. त्याचा वयोगट पन्नाशीच्या पुढचा. त्यानंतर बहुतांश पुरुष अंगमेहनतीचे किंवा वाहतुकीच्या क्षेत्रात काम करीत राहतात. त्यामुळे कचऱ्यातल्या महिलांचे आयुष्य हे तसे कचराच, अशी मनोवृत्ती.

सध्या जमलेला कचरा कोठे टाकायचा यावरुन औरंगाबादमध्ये एवढे रणकंदन सुरू आहे की या क्षेत्रातील भेदभावाचा विषयही चच्रेत येत नाही. सुजाताताईंना या सगळयात जगायचे आहे. जमेल तसे. त्यांच्यासारख्याच अनेक जणी. साधारण ३५० ते ४५० रुपये दररोज कमावणाऱ्या. सुजातासारखी एखादीच. सकाळी पाचपासून राबणारी. केवळ कचऱ्याच्या क्षेत्रातून मोठी कमाई करणारी. कचऱ्याच्या ढिगाऱ्यात काम करणारे हजारो हात महिलांचे आहेत. त्यामुळेच राज्यभर या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या प्रमुख मात्र महिला आहेत. पण धोरण मात्र पुरुषांच्या हातात असल्याने या प्रश्नाकडे असंवेदनशीलपणे बघण्याची सवय जडल्यासारखे वातावरण असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात.

First Published on March 8, 2018 1:12 am

Web Title: international womens day 2018 the success story of sujata tai