परभणी : काँग्रेसच्या इच्छुकांचे अर्ज आणि राष्ट्रवादीच्या मुलाखती आटोपल्यानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून शुक्रवारी (दि. २६) मुलाखत घेण्यात येणार आहेत. एकूणच विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांच्या हालचाली सुरू झाल्या असून उद्या होणाऱ्या वंचितच्या मुलाखतींकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातील कोणते चेहरे वंचितच्या मुलाखतींना हजेरी लावणार याबाबतही मोठी उत्सुकता आहे.

वंचितच्या मुलाखती सकाळी १० वाजता हॉटेल नीरज इंटरनॅशनल येथे होणार आहत. मुलाखतीसाठी पार्लमेंट्री बोर्डाचे सदस्य अण्णाराव पाटील, अशोक सोनवणे, रेखा ठाकूर, प्रा. किशन चव्हाण उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील चारही विधानसभा क्षेत्रातील इच्छुक उमेदवारांनी जिल्हाध्यक्ष (भारिप बहुजन महासंघ) दादाराव पंडित यांच्याकडून उमेदवारी अर्ज घेऊन क्रियाशील सभासद नोंदणी पावती घेऊन मुलाखतीस उपस्थित राहण्याचे आवाहन पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसनेही विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. आमदार विजय भांबळे व आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे या दोन्ही विद्यमान आमदारांसह राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी हेही या मुलाखतींच्या सोपस्काराला अनुपस्थित होते. जिल्ह्यातील एकूण १६ उमेदवारांनी पक्षनिरीक्षकांसमोर या मुलाखती दिल्या. आमदार रामराव वडकुते व अ‍ॅड. उषाताई दराडे या निरीक्षकांच्या समोर ही मुलाखत प्रक्रिया पार पडली. या वेळी माजी मंत्री फौजिया खान, माजी जि.प. अध्यक्ष राजेश विटेकर हे हजर होते.

येथील राष्ट्रवादी भवनात इच्छुकांच्या मुलाखती २२ जुलै रोजी घेण्यात आल्या. गंगाखेड विधानसभा मतदार संघातून केंद्रे यांच्यासह माजी आमदार सीताराम घनदाट हेही या प्रक्रियेत अनुपस्थित होते तर डॉ. संजय कदम, प्रल्हाद मुरकुटे यांनी गंगाखेडसाठी इच्छुक म्हणून आपली मुलाखत दिली तर पाथरी विधानसभा मतदार संघातून लक्ष्मीकांत देशमुख, विठ्ठलराव सूर्यवंशी यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली. परभणी विधानसभा मतदार संघातून माजी महापौर प्रताप देशमुख, शहर जिल्हाध्यक्ष स्वराजसिंह परिहार, किरण सोनटक्के, सोनाली देशमुख, गंगाधर जवंजाळ, अली खान मोईन खान, राजेश आहेर, जाकेर अहमद खान यांनी उमेदवारी मागितली. जिंतूर विधानसभा मतदार संघातून भांबळे यांचा एकमेव अर्ज होता. मात्र, ते अनुपस्थित होते. इच्छुकांनी आपआपला वैयक्तिक तपशील या वेळी निरीक्षकांकडे सादर केला तर अनेकांनी आपले समर्थकही मोठय़ा प्रमाणात आणले होते. निरीक्षकांनी या सर्व इच्छुकांच्या भावना जाणून घेतल्या.

काँग्रेसनेही जिल्ह्यातील इच्छुकांचा कानोसा घेतला असून इच्छुक उमेदवारांचे अर्ज भरून घेतले आहेत. पाथरी विधानसभा मतदार संघातून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर यांचा एकमेव अर्ज असून परभणी विधानसभा मतदार संघातून मात्र डझनभर इच्छुकांची जंत्री काँग्रेसकडे आहे. यात माजी खासदार तुकाराम रेंगे, माजी आमदार सुरेश देशमुख, सिद्धार्थ हत्तीअंबीरे, अ‍ॅड. मुजाहिद खान, भगवान वाघमारे, सुनील देशमुख, बाळासाहेब देशमुख, माजीदलाला, नदीम इनामदार आदींनी पक्षाकडे इच्छुक म्हणून परभणी विधानसभेत लढण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे.