जिल्ह्य़ात काँग्रेस लढवत असलेल्या विधानसभेच्या नगर, कर्जत-जामखेड, श्रीरामपूर, संगमनेर व राहाता या पाच जागांवरील इच्छुक उमेदवारांच्या उद्या, बुधवारी मुंबईत मुलाखती घेण्यात येणार आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ज्या १७४ जागा लढवल्या त्यात जिल्ह्य़ातील ५ जागांचा समावेश आहे. पक्षाने जिल्ह्य़ातील इतर जागांवरील इच्छुकांचेही अर्ज मागवले होते, मात्र त्यांना मुलाखतीसाठी पाचारण केलेले नाही.
मात्र त्याचबरोबर काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडीत वरिष्ठ पातळीवर दिल्लीत जागावाटपाच्या बाबतीत चर्चा सुरूच असल्याने नगरच्या जागेचे काय, हा प्रश्न अधांतरीच आहे. काँग्रेसला नगरच्या जागेवर सातत्याने पराभव स्वीकारावा लागल्याने ही जागा राष्ट्रवादीला मिळावी, यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. नगरच्या जागेसाठी ब्रीजलाल सारडा, विनायक देशमुख, सुभाष गुंदेचा, दीप चव्हाण, सुवर्णा कोतकर व सविता मोरे या इच्छुकांनी येथे पक्ष कार्यालयात अर्ज दाखल केले होते.
केवळ याच पाच जणांना मुलाखतीसाठी बोलवण्याचा निरोप प्रदेश काँग्रेसने शहर जिल्हाध्यक्ष सारडा यांना धाडला होता. त्यामुळे थेट प्रदेश कार्यालयाकडे किंवा ऑनलाइन प्रक्रियेने कोणी दाखल केले आहेत का, याची माहिती येथील पदाधिका-यांकडे नाही. त्यामुळे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा भाचा सत्यजित तांबे हे इच्छुक आहेत की नाही, हे उद्याच स्पष्ट होणार आहे. मात्र पक्षाने आदेश दिल्यास आपण नगरमधून निवडणूक लढवू असे तांबे यांनी पूर्वीच स्पष्ट केले आहे.
श्रीरामपूरमधून आमदार भाऊसाहेब कांबळे, विजय शेलार, अशोक बागूल, डी. एस. निकम यांनी कर्जत-जामखेडमधून बाळासाहेब साळुंके, अंबादास पिसाळ, प्रवीण घुले, राजेंद्र देशमुख तर, संगमनेर व राहाता येथून प्रत्येकी एक म्हणजे अनुक्रमे थोरात व राधाकृष्ण विखे यांचेच अर्ज दाखल झाले आहेत.