राष्ट्रवादीने जिल्ह्य़ातील बाराही विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांचे अर्ज दाखल केल्यानंतर बुधवारी मुंबईत या सर्व इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. श्रीगोंदे मतदारसंघासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव नागवडे तसेच भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेले राहुल जगताप यांनीही येथे हजेरी लावली.
काँग्रेस आघाडीच्या जागावाटपात जिल्ह्य़ातील बारापैकी सात जागा राष्ट्रवादीकडे आहेत. मात्र यंदा त्यांनी बाराही मतदारसंघात इच्छुकांकडून अर्ज मागवले आहेत. या सर्व इच्छुकांच्या आज मुंबईत मुलाखती झाल्या. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, मधुकर पिचड आदी या वेळी उपस्थित होते.
नगर शहर मतदारसंघासाठी महापौर तथा पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संग्राम जगताप, युवकचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, माजी नगरसेवक विनीत पाऊलबुध्दे, अंबादास गारुडकर आदींनी आज मुलाखती दिल्या. ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे, माजी खासदार प्रसाद तनपुरे या ज्येष्ठांनीही येथे हजेरी लावली. राहुरी तालुका पंचायत समितीचे सभापती शिवाजी गाडे यांनीही येथील उमेदवारीसाठी मुलाखत दिली. अकोले मतदारसंघात पालकमंत्री मधुकर पिचड यांचे चिरंजीव वैभव पिचड यांनी एकटय़ानेच आज मुलाखत दिली. येथून त्यांचाच एकमेव अर्ज पक्षाकडे दाखल झाला आहे. पक्षाच्या जिल्ह्य़ातील अनेक इच्छुकांनी मुंबईतही कार्यकर्त्यांसह मोठे शक्तिप्रदर्शन केल्याचे समजते.
 श्रीगोंदेसाठी स्वतंत्र बैठक
माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकल्याने येथे पक्षाचा उमेदवाराचा शोध सुरू आहे. तालुक्यातील सर्व पाचपुते विरोधकांना एकत्र करण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीच पुढाकार घेतला आहे. त्यामुळेच या हालचालींना महत्त्व प्राप्त झाले असून त्याचाच एक भाग म्हणून शिवाजीराव नागवडे व राहुल जगताप यांनीही या मुलाखतींना हजेरी लावली. या मतदारसंघाबाबत निर्णय घेण्यासाठी मुंबईतच रात्री उशिरा पुन्हा बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र उशिरापर्यंत त्याचा तपशील मिळू शकला नाही.