|| विजय राऊत

रंगीबेरंगी आतषबाजी, तारपानृत्य आणि आदिवासी लोककलांचा आविष्कार

विजयादशमीनिमित्त जव्हार शहरातील ‘दरबारी दसरा’ मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. रंगीबेरंगी आतषबाजी, तारपानृत्य, ढोलनृत्य आणि आदिवासी लोककलांचा आविष्कार यानिमित्त पाहायला मिळाला. यंदा जव्हारचे संस्थानिक मुकणे महाराजांच्या प्रतिकृतीचा चित्ररथ तयार न करता दुर्गामाताची मिरवणूक काढण्यात आली.

जव्हार शहराला दसरा उत्सवाची गौरवशाली परंपरा आहे. विजयादशमीनिमित्ताने या वर्षीही जव्हार नगर परिषद प्रशासनातर्फे दसरा उत्सवाची जय्यत तयारी करून मोठय़ा उत्साहात हा सण साजरा करण्यात आला. संध्याकाळी पाच वाजता दुर्गामातेची मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक यशवंतनगर येथील विजय स्तंभापासून थेट हनुमान पॉइंटपर्यंत काढण्यात आली.

या मिरवणुकीत तारपा नृत्य, ढोलनृत्य, लोककला यांचे सादरीकरण करण्यात आले. हनुमान पॉइंट येथे राक्षसाचा पुतळा तयार करून दहन करण्यात आला. भ्रूण हत्या, बलात्कार यांचा राक्षसरूपी पुतळा तयार करून त्याचे दहन करण्यात आले. त्यानंतर आकाशामध्ये रंगीबेरंगी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी शेकडो नागरिकांनी या उत्सवाचा आनंद साजरा केला.

जव्हारचा दसरा हा एक सांस्कृतिक सोहळा म्हणून साजरा होत असतो. सहाशे वर्षांंची जुनी परंपरा कायम ठेवली आहे.

कुस्त्यांचे सामने

दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचे सामने होतात. जव्हारमधील जुना राजवाडा या ठिकाणी कुस्त्यांचे सामने रंगणार आहेत. या सामन्यांसाठी पालघर, भिवंडी, नाशिक, ठाणे, इगतपुरी, घोटी येथून अनेक लहान-मोठे कुस्ती खेळाडू येतात. जुना राजवाडा या ठिकाणी कुस्त्यांचे सामने रंगणार आहेत.