जिल्हय़ातील अंगणवाडय़ांमध्ये वितरित झालेल्या भेसळयुक्त राजगिरा चिक्कीसंदर्भात अन्न व औषध प्रशासन विभागाने अधिक तपास सुरू केला आहे. यासंदर्भात एकात्मिक बाल विकास सेवा विभागाशी झालेला करार तपासला जाईल तसेच पुरवठादार, उत्पादक यांचीही चौकशी केली जाणार असल्याचे व त्यानंतरच कारवाईची पावले उचलली जातील असे विभागाचे सहायक आयुक्त भोसले यांनी आज, शुक्रवारी ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट केले.
दरम्यान, भेसळयुक्त चिक्कीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज ससे यांनी यासंदर्भातील आपला अहवाल एकात्मिक बाल विकास सेवा आयुक्तांना आजच मुंबईत सादर केल्याचे समजले.
गेल्या दीड महिन्यापासून अंगणवाडय़ांतून वितरित केलेली राजगिरा चिक्की वादग्रस्त बनली आहे. चिक्कीचा जि.प.ने सरकारी प्रयोगशाळेतील तपासणीसाठी पाठवलेला नमुन्यांचा अहवाल चिक्की योग्य असल्याचा आला होता. प्रत्यक्षात मात्र अनेकांनी या चिक्कीची चव चाखली तेव्हा चिक्की माती व दगडकण मिश्रित असल्याचा अनुभव मिळाला आहे. सदस्यांनीही यासंदर्भात तक्रार केली होती. त्यामुळेच अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अहवालाची प्रतीक्षा केली जात होती. या विभागाचा तपासणी अहवाल बुधवारी प्राप्त झाल्यावर त्यांनी तो गुरुवारी जि.प.कडे सादर केला.
पुढील कार्यवाही काय असेल, यासाठी विभागाचे सहायक आयुक्त भोसले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, की भेसळयुक्त चिक्कीसंदर्भात कारवाई करण्यापूर्वी उत्पादन कोणी केले, कोठे झाले, पुरवठा कोणी केला, त्यांच्याकडील परवाने याविषयी माहिती घेतली जाणार आहे. तसेच पुरवठादार व एकात्मिक बाल विकास सेवा विभाग यांच्यातील करारनामा तपासला जाईल. याच दरम्यान कायदेशीर तरतुदीनुसार ज्याच्या मालाबद्दल तक्रार आहे, त्याला ३० दिवसांत फेरतपासणीसाठी अर्ज करण्याची संधी दिली जाते, त्याच्या अंतिम अहवालानंतरच कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी ससे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी आयुक्तांच्या मार्गदर्शनानुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे, असे सांगितले.