महापुरावेळी आणि पुरानंतर महापालिकेकडून करण्यात आलेल्या खर्चाची स्वतंत्र त्रिसदस्यीय समितीमार्फत चौकशी करण्यात येईल आणि यामध्ये जर कोणी दोषी आढळले तर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्त नितीन कापडणीस यांनी शुक्रवारी दिले.

महापूर काळामध्ये शहरात करण्यात आलेली आलेली विविध कामे आणि खर्च करण्यात आलेली रक्कम याबाबतची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी शुक्रवारी सर्व पक्षिय कृती समितीने आयुक्त नितीन कापडणीस यांच्याकडे केली. याबाबत सर्व काम पारदर्शी करण्यात आले असून नागरिकांना सर्व माहिती उपलब्ध करून देण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले.

महापुरात व महापुरानंतर सर्व विभागामार्फत झालेली खरेदी, भाडे कराराने घेतलेली वाहने, जेवण बिल, बांधकाम विभागामार्फत झालेली कामे प्रभाग समिती क्रमांक १ मधील पावसाळी मुरूम कुठे कुठे टाकला आहे किंवा शिल्लक आहे, याबाबत नागरिकांच्या मनात संशय असून प्रशासनाने चांगले काम करूनही शंकास्पद स्थिती निर्माण होत असल्याचे दिसत आहे. याबाबत शुक्रवारी सतीश साखळकर यांच्यासह काही नागरिकांनी आज आयुक्त कापडणीस यांची भेट घेऊन या कामाबाबतची माहिती व खर्च नागरिकांसाठी खुला करण्याची मागणी केली.

ही मागणी आयुक्तांनी मान्य करीत या कामांची आणि खर्चाची त्रिसदस्यीय समिती नियुक्त करून चौकशी केली जाईल आणि यात जर कोणी अधिकारी वा कर्मचारी दोषी आढळला तर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.