टोलविरोधी कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पुढील तपास न्यायालयाने परवानगी दिली, तर पोलीस अधीक्षक डॉ. मनोज शर्मा याच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येणार आहे. याबाबत आवश्यकता वाटल्यास उत्तर प्रदेशमध्ये तपास पथक पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक मोहिते यांनी सोमवारी दिली.
टोलविरोधी लढय़ात अग्रभागी असणारे कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे यांना रविवारी  ७५०००३३२२४ या मोबाइल नंबरवरून जीवे मारण्याची धमकी येत होती. याबाबत त्यांनी रविवारी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते यांनी केलेल्या प्राथमिक तपासात या नंबरचे कार्ड उत्तर प्रदेशमधून खरेदी केले असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या नंबरचे लोकेशन समजण्यासाठी व पुढे तपास करण्यासाठी न्यायालयाच्या परवानगीची आवश्यकता आहे.