महागाईला तोंड देण्यास बचत खाते अथवा मुदत ठेवीमधील गुंतवणुकीपेक्षा शेअर्समागील गुंतवणूक फायद्याची ठरते. निश्चित दिशा, अभ्यासपूर्ण व वेळेवर अचूक निर्णय घेतला, तर शेअर्स बाजारामधील आपल्या व्यवसायात चांगला परतावा मिळवू शकतो. त्यामुळे शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास पैसे बुडतात असा समज चुकीचा असल्याचे सेंट्रल डिपॉझीटर्स सव्‍‌र्हिसेस इंडस्ट्रिजच्या प्रशिक्षण विभागाचे प्रमुख व अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर ठाकूर यांनी सांगितले.
‘श-शेअरबाजाराचा’ या शेअरबाजाराविषयी परिचय करून देणेबाबत कराड अर्बन बँकेने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला बोलत होते. चंद्रशेखर ठाकूर यांचा शेअरबाजाराबाबत जनतेला जागरूक करण्यासाठी हा १०११ वा कार्यक्रम होता. या कार्यक्रमास बँकेचे अध्यक्ष डॉ.सुभाष एरम, अर्बन कुटुंब प्रमुख सुभाषराव जोशी, मुख्यकार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव यांच्यासह कराड अर्बनचे सर्व संचालक व पदाधिकारी उपस्थित होते.
चंद्रशेखर ठाकूर म्हणाले, की देशातील १२४ कोटी लोकसंख्येचा विचार करता त्या तुलनेत डी मॅट खात्यांची संख्या फार कमी आहे. डी मॅट खात्याद्वारे शेअर्समध्ये गुंतवणूक फायद्याची असून आता इंटरनेटमुळे शेअर्सचे व्यवहार अगदी सुलभ पूर्ण होतात. त्यासाठी पूर्वीसारखे ३० दिवस लागत नाहीत. अगदी सहजपणे आणि कमी वेळेत जास्त फायदा मिळू शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी डी मॅट खाती उघडून त्याद्वारे शेअर्समध्ये गुंतवणूक करावी. कराड अर्बन बँकेनेही अधिकृत ब्रोकरशी करार करून डी मॅट खाती उघडून ग्राहक सेवेचे नवे दालन सुरू करावे. सध्या ब्रोकर, खाजगी बँका, सहकारी बँका व राष्ट्रीयकृत बँकांद्वारे डी मॅट खाती उलघडली जातात. महागाईला तोंड देण्यास सेव्हिंग किंवा मुदत ठेवीमधील गुंतवणुकीपेक्षा शेअर्समागील गुंतवणूक फायद्याची ठरते. २०१३ मध्ये भारतीयांनी ३ कोटी २९ हजार २३८ कोटी रुपये किमतीचे १०९२ मेट्रीक टन सोने खरेदी केले होते. सोन्यातील या खरेदीतून ग्राहकांना काहीच फायदा होत नाही, त्याउलट तोटाच होतो परंतु जागरूकपणे शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास फायदा होतोच असा दावा ठाकूर यांनी केला. मार्केटमध्ये १,३३६ ब्रोकर असून, त्यांच्या तसेच त्यांच्या सब ब्रोकर्सकडून ग्राहकांना शेअर्स खरेदी किंवा विक्री करता येते. शेअर्समधील गुंतवणुकीला इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंडद्वारे प्रती ग्राहक रुपये १५ लाख इतके संरक्षण दिले जाते. सुभाषराव जोशी म्हणाले, की शेअर बाजाराबाबत अनेकांना इतकी सखोल माहिती नव्हती, ठाकूर यांच्या व्याख्यानामुळे शेअर्स बाजाराबाबत सखोल माहिती मिळली. त्यांच्याकडील माहिती व ज्ञानाचा उपयोग करून कराड अर्बन बँक निश्चितपणे डी मॅट खाती उघडण्याची सुविधा सुरू करेल. प्रास्ताविक संतोष चांदोरकर यांनी केले. चंद्रशेखर ठाकूर यांनी त्यांच्या व्याख्यानानंतर उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर दिली.