केबीसीचा बहुचर्चित कोटय़वधीचा घोटाळा गाजत असतानाच दामदुपटीचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना सुमारे २१ लाख रुपयांना फसविल्याचे सुपर पॉवर इन्व्हेस्टमेन्ट सव्र्हिसेस इंडिया लि. चे प्रकरण औरंगाबाद शहरात उघडकीस आले. या प्रकरणी पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने फरारी दाम्पत्यास शनिवारी पुण्यात अटक केली.
सुपर पॉवर इन्व्हेस्टमेन्ट या नावाने सुरू केलेल्या या कंपनीद्वारे दामदुपटीचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची लाखोंची फसवणूक करण्यात आली. कंपनीचा संचालक दीपक केडू पारखे (वय ३८, क्यू ४०१, जास्मीनियम कॉम्प्लेक्स, मगरपट्टा, पुणे) व त्याची पत्नी दिव्या (वय ३२) या दोघांनी औरंगाबाद शहरातील सिंधी कॉलनीत या नावाने कंपनी थाटली होती. शिवाजी एकनाथ पोळ (वय ५०, डिग्रस, तालुका सेलू, जिल्हा परभणी), सतीश पोळ, शेषराव घुले, प्रधान आडे व हरिष साळवे या अन्य आरोपींच्या मदतीने ग्राहकांना जाळ्यात ओढले. शहरातील नंदा बळीराम पाटील (प्रियदर्शनी कॉलनी, औरंगाबाद) यांनी या कंपनीचा मोठा कारभार पाहून वडील, भाऊ व बहिणी अशा नातेवाईकांच्या नावाने १७ लाख ८५ हजार रुपये गुंतवले होते. परंतु कंपनीने त्यांना प्रत्यक्षात कोणताही परतावा न देता गाशा गुंडाळला. फिर्यादीने एकूण २० लाख ८५ हजारांची गुंतवणूक या कंपनीत केली होती. तुम्ही केलेल्या गुंतवणुकीत तुम्हाला दर महिन्याला २६ हजार २५० रुपये या प्रमाणे २६ महिने पैसे मिळतील, असे आमिष त्यांना दाखवण्यात आले. मात्र, परतावा दूरच राहिला, आपले आहे ते पैसेही मिळत नसल्याचे पाहून फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पाटील यांनी पोलिसांत फिर्याद दिली. जवाहरनगर पोलिसांनी या सातजणांवर गुन्हा नोंदविला. आरोपी पारखे याने वर्षभरापूर्वी ही कंपनी सुरू करून बनावट दस्तावेज तयार केले होते. दिव्याने एजंटांकरवी ग्राहकांना जाळ्यात ओढले. मात्र, गुंतवणूकदारांनी पैशांची मागणी केली असता पारखेसह अन्य आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे सुरू केली.
केबीसीतील फसवणूक आठ कोटींची!
दरम्यान, केबीसी कंपनीकडून फसवणूक झाल्याप्रकरणी गेल्या दोन दिवसात तब्बल ९७८ तक्रारी पोलिसात प्राप्त झाल्या आहेत. या सर्वाना ७ कोटी ८४ लाख ८ हजार ५०० रुपयांना गंडविण्यात आले. या सर्वानी नाशिकला जाऊन केबीसी कंपनीत ही गुंतवणूक केली होती. या तक्रारी नाशिक पोलिसांत वर्ग करण्यात आल्या आहेत.