गेली दहा वर्षे सातत्याने सावंतवाडीत भरणारे निमंत्रितांचे विभागीय कवयित्री संमेलन २० जानेवारी रोजी श्रीराम वाचन मंदिरमध्ये सायंकाळी ४.३० वा. आयोजित करण्यात आले आहे.
आरती मासिक, कोकण मराठी साहित्य परिषद व श्रीराम वाचन मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संमेलनात महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक येथील नामवंत कवयित्रींना तसेच जिल्ह्य़ातील कवयित्रींना निमंत्रित करण्यात आले आहे.
या संमेलनाच्या अध्यक्षा ज्येष्ठ कवयित्री सुनंदा भोसेकर या असतील. सुनंदा भोसेकर वा भोपाळ येथे बँकेच्या अधिकारी आहेत.
त्यांनी काव्यलेखन, एकांकिका, मराठी व हिंदी नाटय़लेखन, सदरांचे लेखन, हिंदी, गुजराथी व मल्याळम भाषांतील कवितांचे इंग्रजीत भाषांतर केले आहे. त्यांच्या अनोळखी प्रदेशात व गोपाळा रे गोपाळा काव्यसंग्रहाचा आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या आहेत.
या संमेलनात कवयित्री मंदाकिनी पाटील (बदलापूर), संगीता अरबुने (मुंबई), अनघा तांबोळे (बंगलोर), डॉ. प्रीया दंडगे (कोल्हापूर), प्रा. कविता बोरकर (गोवा), डॉ. तरुजा भोसले, वैशाली पंडित, प्रा. दीपाली काजरेकर, प्रा. संध्या तांबे, मनीषा जाधव, नीलम जोशी, डॉ. शरजू आसोलकर, प्रा. प्रगती अमृते, अनुराधा जोशी या सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील कवयित्री सहभागी होतील.
या संमेलनाच्या निमित्ताने घेण्यात येणाऱ्या गोवा-सिंधुदुर्ग मर्यादित खुल्या काव्यलेखन स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्या संमेलनात आपली कविता सादर करतील.
या निमित्ताने सावंतवाडीतील  महत्त्वाच्या महिला संस्थांचा सत्कार केला जाईल.
काव्यरसिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक प्रतिनिधी कवयित्री उषा परब, वाचन मंदिरचे जयानंद मठकर, डॉ. जी. ए. बुवा, भरत गावडे आदींनी केले आहे.