इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पुण्यातील सामन्यांसाठी लागणाऱ्या पाण्यावरुन मुंबई हायकोर्टाने शुक्रवारी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला (एमसीए) दणका दिला. आयपीएलमध्ये पिंपरी चिंचवड येथील गहुंजे मैदान आणि खेळपट्टीच्या देखभालीसाठी पवना जलसिंचन प्रकल्पातून पाणी घेण्यास मुंबई हायकोर्टाने नकार दिला. क्रिकेटच्या खेळपट्टीसाठी ‘पवना’तून पाणी घेणे बेकायदा आहे, असे हायकोर्टाने सांगितले.

कावेरी तंट्यामुळे आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील चेन्नई येथे होणारे सामने पुण्यात होणार आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए) या मैदानासाठी पवना जलसिंचन प्रकल्पातून पाणी घेणार होती. मात्र, याविरोधात हायकोर्टात याचिका दाखल झाली होती. या याचिकेवर हायकोर्टाचे न्या. अभय ओक आणि न्या. रियाज छागला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. हायकोर्टाने पवना प्रकल्पातून घेण्यास मज्जाव करतानाच या प्रकल्पातून खेळपट्टीच्या देखभालीसाठी पाणी घेणे बेकायदाच आहे, असे मत नोंदवले.

दरम्यान, एप्रिलमध्ये झालेल्या सुनावणीत हायकोर्टाने पुढील सुनावणीपर्यंत आयपीएलसाठी पवना प्रकल्पातून पाणी घेण्यास मज्जाव केला होता. मात्र, आता हा आदेश दिल्याने गहुंजेसाठी मैदानासाठी या प्रकल्पातून पाणी घेता येणार नाही.