सध्या सुरू असलेल्या IPL क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या टोळीला सोलापुरात शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले. या टोळीचे धागेदोरे कर्नाटकात असून या प्रकरणी चौघा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून ३८ लाख ४४ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जुना पुणे चौत्रा नाका परिसरातील अवंती नगरात एका अपार्टमेंटमध्ये IPL क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावला जात असल्याची माहिती पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांना मिळाली होती. त्यानुसार शहर गुन्हे शाखेच्या पथकाने तेथे धाड टाकली असता तेथील एका सदनिकेत चेतन रामचंद्र वन्नाल (वय २६, रा. गांधीनगर झोपडपट्टी, अक्कलकोट रोड, सोलापूर) व विघ्नेश नागनाथ गाजूल (वय २४, रा. भद्रावतीपेठ, सोलापूर) हे दोघे जण क्रिकेट सामन्यांवर लावल्या जाणाऱ्या सट्ट्याचा हिशेब लिहित होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा क्रिकेट सट्टा लावणाऱ्या मालक व भागीदारांची नावे पुढे आली.

कर्नाटकातील कलबुर्गी येथे बसवेश्वरनगरात एका घरातून अतुल सुरेश शिरशेट्टी (रा. अवंतीनगर, सोलापूर) व प्रदीप मल्लय्या कारंजे (रा. भवानी पेठ, सोलापूर) यांना ताब्यात घेण्यात आले. सट्टा खेळण्यासाठी वापरले जाणारे सुमारे ३८ लाख ४४ हजार रूपये किंमतीचे साहित्य जप्त करण्यात आले. यात इनोव्हा मोटारीसह दोन वाहने, १३ मोबाइल संच, हॉटलाईन मशीन, लॅपटॉप, टीव्ही, डीव्हीआर आदी साहित्याचा समावेश आहे. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त बापू बांगर व सहाय्यक पोलीस आयुक्त अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय साळुंखे व उपनिरीक्षक संदीप शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली. गेल्या आठवड्यातही क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या एका तरूणाला पोलिसांनी अटक केली होती.