27 February 2021

News Flash

“IPL संपेपर्यंत मराठीत समालोचनाचा पर्याय द्या नाहीतर…”; मनसेचा डिस्ने हॉटस्टारला इशारा

हिंदी, इंग्रजी, तेलगु, कानडी आणि बंगाली आहे मग मराठी का नाही?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे. (संग्रहित छायाचित्र)

ऑनलाइन शॉपिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या अ‍ॅमेझॉन अ‍ॅपमध्ये मराठीचा समावेश करण्यासंदर्भातील मोहिमेनंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपला मोर्चा डिस्ने हॉटस्टारकडे वळवला आहे. सध्या सुरु असणाऱ्या इंडियन प्रिमियर लीग म्हणजेच आयपीएलदरम्यान सामन्यांचे समालोचन मराठीमध्ये करण्यात यावे यासाठी मनसेने डिस्ने हॉटस्टार कंपनीला पत्र पाठवलं आहे. यासंदर्भातील माहिती मनसेच्या कामगार सेनेचे चिटणीस केतन नाईक यांनी ट्विटरवरुन दिली आहे.

हॉटस्टार डिस्नेच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर इतर प्रदेशिक भाषांप्रमाणे मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी करणारे पत्र मनसेने कंपनीला पाठवलं आहे. सध्या आयपीएलचे समालोचन हिंदी, इंग्रजी, तेलगु, कानडी आणि बंगाली भाषेमध्ये उपलब्ध असून अ‍ॅपमध्ये मराठीचा पर्याय देण्यात आलेला नाही असं मनसेनं म्हटलं आहे. आपल्या कंपनीचे मुख्य कार्यालय मुंबईत आहे. त्याचप्रमाणे आयपीएलचा मोठा प्रेक्षक वर्ग हा मराठी आहे असं असतानाही तुम्हाला मराठीचा विसर पडल्याचे दिसत आहे, अशा शब्दात मनसेने कंपनीला खडेबोल सुनावले आहेत.

आयपीएलचा यंदाचा हंगाम संपण्याआधी कंपनीने मराठी भाषेमध्ये समालोचन ऐकण्याचा पर्याय उपलब्ध करुन द्यावा अशी विनंती या पत्रामध्ये मनसेने केली आहे. तसेच पत्राच्या शेवटी कंपनीने वेळेत यासंदर्भात निर्णय घेतला नाही तर ‘मनसेच्या प्रचलित पद्धतीने आंदोलन करावे लागेल व त्यामुळे उद्भवणाऱ्या सर्व परिस्थितीची जबाबदारी आपली राहील याची नोंद घ्यावी,’ असंही मनसेनं म्हटलं आहे. “आय.पी.एल.क्रिकेट सामान्यांची कॉमेंट्री मराठीत करण्यास कुठल्याही प्रकारची अडचण आली तर आम्ही आवश्यक ते सहकार्य करू,पण नुसतीच चालढकल केलीत तर महाराष्ट्र सैनिकांशी गाठ आहे हे लक्षात असु द्या..”, अशी कॅप्शन देत केतन यांनी हे पत्र ट्विटरवरुन शेअर केलं आहे.

तर अन्य एका ट्विटमध्ये केतन यांनी, “क्रिकेट सामान्यांची कॉमेंट्री मराठी भाषेत का नसावी? महाराष्ट्रात एकापेक्षा एक असे उत्तम समालोचक (Commentator) आहेत. गरज असल्यास आम्ही शोधून देऊ,” अशी ऑफरही कंपनीला दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2020 9:09 am

Web Title: ipl commentary should have marathi option raj thackeray mns letter to diseny hotstar scsg 91
Next Stories
1 जाधव, चावला यांना संघात स्थान का?
2 IPL 2020 : बेंगळूरुविरुद्ध चुका टाळण्यासाठी कोलकाता उत्सुक
3 VIDEO: निकोलस पूरनची तुफान फटकेबाजी; पंजाबच्या विजयात उचलला मोलाचा वाटा
Just Now!
X