News Flash

पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडल्या ; गणेशोत्सवातील बंदोबस्तावर विघ्न!

गृह विभागाची घडी  नव्याने बसवताना वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्याच रखडल्या.

प्रतिनिधिक छायाचित्र

नागपूर : राज्यातील आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांची लॉबी अतिशय प्रभावशाली असून ही लॉबी त्यांना हवे तसे निर्णय सरकारला घ्यायला भाग पाडत असल्याचे नेहमीच बोलले जाते. मात्र, पहिल्यांदा जुलै उलटून जात असतानाही आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडल्याने त्यांच्या लॉबीला मोठा धक्का बसला आहे, तर दुसरीकडे येणाऱ्या गणेश उत्सवाच्या बंदोबस्तावरही विघ्न घोंगावत आहे.

राज्याचे मुख्य सचिव सुमित मलिक निवृत्त झाल्यावर देवेंद्र फडणवीस सरकारने चार अतिरिक्त मुख्य सचिवांना कनिष्ठ असलेल्या डी.के. जैन यांच्याकडे मुख्य सचिव पदाची धुरा सोपवली. त्यानंतर गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुधीरकुमार श्रीवास्तव यांची बदली करून त्या ठिकाणी सुनील पोरवाल यांना पाठवण्यात आले. या सर्व घडामोडी मे महिन्यात घडल्या. त्यामुळे सचिवालयातील सर्वात वरिष्ठ सनदी अधिकारी मेधा गाडगिळ आणि श्रीवास्तव हे सुटीवर निघून गेले.

गृह विभागाची घडी  नव्याने बसवताना वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्याच रखडल्या. राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर हे ३० जूनला सेवानिवृत्त झाले. त्यांच्या पदावर मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांची वर्णी लागली.

केंद्रातून परत आलेले सुबोध जयस्वाल हे मुंबईचे पोलीस आयुक्त झालेत. मात्र, या व्यतिरिक्त ठाणे, पुणे, नागपूर, नवी मुंबई येथील पोलीस आयुक्तांची बदली झाली नाही.

सोबतच विविध जिल्ह्य़ांचे पोलीस अधीक्षकही बदलीच्या प्रतीक्षेत आहेत. १३ सप्टेंबरपासून राज्यात गणेश उत्सव सुरू होत आहे. हा उत्सव निर्विघ्नपणे पार पडावा म्हणून पोलीस दोन ते तीन महिन्यांपासून बंदोबस्ताची आखणी करतात.

आता आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या  तरी त्यांना शहर व जिल्हा समजायला किमान दोन महिने लागतील आणि गणेश उत्सवाला केवळ दीड महिना उरला आहे. परिणामी, बंदोबस्तात त्रुटी राहण्याची शक्यता जास्त आहे. यातून सरकार कसा मार्ग काढेल, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 20, 2018 2:03 am

Web Title: ips officers transfer stopped due to ganesh festival
Next Stories
1 संघ विरोधामुळेच भाजप मंत्री, आमदारांची स्मृतिमंदिर भेट टळली?
2 अधिकाऱ्यांच्या मनमानीला अंकुश
3 मनमोहन सिंग यांच्याच काळात बुलेट ट्रेनची मुहूर्तमेढ -फडणवीस
Just Now!
X