News Flash

मालवण: बाळासाहेबांचा फोटो पाहताच आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर म्हणाले…

लिओ हे सहकुटुंब मालवणच्या खासगी दौऱ्यावर आहेत

बाळासाहेबांचा फोटो पाहून लिओ वराडकर म्हणाले...

भारतीय वंशाचे आयर्लंडचे पंतप्रधान डॉ. लिओ वराडकर हे रविवारी आपल्या मूळ गावी म्हणजेच मालवण तालुक्यातील वराडमध्ये दाखल झाले. लिओ हे सहकुटुंब या खासगी दौऱ्यावर आले आहेत. मागील चार दिवसांपासून ते आपल्या मूळ गावीच मुक्काम करुन आहेत. याच भेटीदरम्यान त्यांनी मालवण नगरपरिषदेला भेट दिली. त्यावेळी स्थानिकांना थक्क करणारा एक प्रकार घडला.

खासगी दौऱ्यावर असणाऱ्या लिओ वराडकर यांनी सोमवारी नगरपरिषदेला भेट दिली तेव्हा अनेक स्थानिक नेत्यांची नगरपरिषदेच्या सभागृहामध्येच भेट घेतली. यावेळी स्थानिक नेत्यांकडून येथील विकासकामांची माहिती घेत असतानाच वराडकर यांची नजर सभागृहामधील राजकीय नेत्यांच्या फोटोंवरुन फिरत होती. अचानक त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोकडे बोट दाखवत, “ही इज शिवसेना लीडर” असं म्हटलं. त्यांनी बाळासाहेबांना ओळखल्यामुळे अनेक स्थानिक नेत्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. लिओ वराडकर हे मूळचे वराडमधील असले तरी लहानपणापासून ते परदेशातच आहेत. त्यांचा मालवणमधील राजकारणाशी किंवा नेत्यांशी थेट संबंध आलेला नाही. असं असतानाही त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचा फोटो ओळखल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. लिओ यांनी बाळासाहेबांचा फोटो ओळखल्यानंतर राजकारणावरील गप्पा सुरु झाल्या. नगराध्यक्ष महेश कांदळगावकर आणि नगरसेवक नितीळ वाळके यांच्याकडून लिओ यांनी बाळासाहेब ठाकेर तसेच त्यांचे पुत्र आणि महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची माहिती जाणून घेतील.

मालवणात आलेल्या डॉ. लिओ यांच्यासोबत त्यांचे वडील डॉ. अशोक वराडकर, आई मेरिअम, बहीण सोफिया, सोनिया, एरीक आणि मुलेही आहेत. वराडकर कुटुंबीय मूळ गावी दाखल झाले त्यावेळी गावातील सुवासिनींनी ओवाळून व फुलांच्या पाखरणीत त्यांचे वराडमधील लोकांनी स्वागत केलं. वराडकर कुटुंबीय सध्या मालवणमधील पाहुणचार स्वीकारत आहेत. मालवाणी जेवणाचा आस्वाद घेण्यापासून ते मालवणमधील वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देण्यात सध्या वराडकर कुटुंब व्यस्त आहे.

लिओ वराडकर यांचा राजकीय प्रवास

लिओ यांचे वडील अशोक वराडकर १९६० साली भारतातून इंग्लंडला गेले. ते तिथेच स्थायिक झाले. लिओ यांचं कुटूंब मुळचं सिंधुदूर्गमधल्या वराड गावचं असून त्यांचे चुलते आणि इतर नातेवाईक आजही वराडमध्येच राहतात. लिओ यांची २०१७ साली आयर्लंडच्या पंतप्रधानपदी निवड झाली. २०१७ साली झालेल्या आयर्लंडच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीत त्यांनी सिमोन कोव्हिने यांचा पराभव केला होता. वराडकर यांना ७३ पैकी ५१ मते मिळाली होती. वयाच्या २२ व्या वर्षी राजकारणात पदार्पण करणारे लिओ २७ व्या वर्षी पहिल्यांदा संसदेत निवडून गेले. त्यानंतर २०११ ते २०१३ या कालावधीत त्यांनी वाहतूक, पर्यटन आणि क्रीडा मंत्रीपद भूषवलं. २०१४ ते २०१६ या काळात ते आयर्लंडचे आरोग्य मंत्री होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2020 12:36 pm

Web Title: ireland pm leo varadkar reaction after he saw balasaheb thackeray photo scsg 91
Next Stories
1 रायगड- उरणजवळ तेलाने भरलेले टँकर उलटले, रस्त्यावर तेल पसरल्याने वाहतूक कोंडी
2 “…तेच ठाकरे तुमच्यावर थुंकले”; मंत्रिमंडळातून डावललेल्या रामदास कदमांवर घणाघाती टीका
3 पंढरपूर : आजपासून विठ्ठल मंदिरात मोबाईलला नो एन्ट्री
Just Now!
X