पालकमंत्री व स्थानिक लोकप्रतिनिधी व राज्य शासनाविरोधात जोरदार नारेबाजी, निषेधाच्या घोषणा करत व सुरजागड येथील लोह उत्खनन पुन्हा सुरू करण्याचे शासनाचे प्रयत्न हाणून पाडण्याच्या निर्धारासह ठाकूरदेव यात्रेचा रविवारी समारोप झाला. या यात्रेत ७० गावातील ५ हजार लोक सहभागी झाले असावेत, असा अंदाज आहे.

शनिवारी यात्रेच्या मुख्य दिवशी पुजारी व स्थानिक गावकऱ्यांनी दुपारी १ वाजता पहाड चढायला सुरुवात केली. दुपारी अडीच वाजता तेथील ठाकूरदेवाच्या मंदिरात पूजा केली. यावेळी अनेकांनी बकऱ्यांचा बळी दिला. त्यानंतर पुन्हा खाली यात्रास्थळी संमेलन झाले.

या संमेलनात सूरजागड इलाका भूमिया करपा हिचामी व इलाका सेहनाल सैनू गोटा, विस्थापन विरोधी जनविकास आंदोलनाचे केंद्रीय संयोजक समिती सदस्य महेश राऊत, रामसुराम काटेंगे, सीयाराम हलामी, हरिदास पदा, प्रल्हाद पोरेट्टी, बासू पावे, वसंत पोटावी, तोडसा इलाका प्रतिनिधी कारू रापंजी, रामजी गुम्मा तर मुच्ची दुर्गा, ग्रामविकास जनांदोलनाच्या उपाध्यक्ष जयश्री वेळदा यांची भाषणे झाली. पालकमंत्री अंबरीश आत्राम, खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी व राज्य आणि केंद्र शासनाच्या विरोधात सलग दोन दिवसांच्या कार्यक्रमात जोरदार नारेबाजी करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी लॉयड मेटल्स प्रकल्प पुन्हा सुरू करण्याचे जाहीर केल्यामुळे राज्य शासन दडपशाही व पोलिसी बळाचा वापर करून स्थानिक आदिवासींना त्यांच्याच क्षेत्रातून बेदखल करत आहे. याविरुध्द आंदोलन तीव्र करण्याचा व लॉयडला येथून हाकलण्याचा निर्णय या सभेत व्यक्त करण्यात आला. त्यानंतर रात्री पुन्हा संमेलनातील प्रतिनिधींनी सूरजागड पहाडाला वाचविण्याची गरज व्यक्त केली.

दरम्यान, रविवारी यात्रेच्या समारोपाला पुन्हा एकदा संमेलनस्थळी सर्व एकत्र आले. तसेच भविष्यात सूरजागड पहाडावर लॉयड मेटल्सच्या उत्खननाला  विरोध करण्याचा निर्धार करण्यात आला. ही यात्रा यंदा बऱ्याच अर्थाने लक्षणीय ठरली आहे. कारण, यंदा प्रथमच बऱ्याच वर्षांंनी यात्रेत परिसरातील बहुसंख्य गावातील आदिवासी एकत्र आले होते. सूरजागड पहाडावर आलेले आरिष्ट दूर करावे, अशी प्रार्थनाच जणू सर्वानी ठाकूरदेवांकडे केली.

सूरजागड पहाडी उत्खनन करणाऱ्या जनविरोधी सरकारकडून वाचली तरच आम्हा आदिवासींना भविष्यात रानमेवा मिळेल अन्यथा, आमच्या पिढीचे भविष्य नाही, अशी प्रतिक्रिया   अनेकांनी व्यक्त केली. बेरोजगारांना रोजगार आणि विकासाच्या नावाने खोटे स्वप्न दाखवून फसविणे बंद करा, स्थानिकांना रोजगार व विकास नाकारणारे सर्व जनविरोधी विनाशकारी खाणी तात्काळ रद्द करा, जनविरोधी आगरी-मसेली, सूरजागड, बांडे, दमकोंडवाही खाण प्रकल्प रद्द झालेच पाहिजे, टीपागड व इतर प्रस्तावित अभयारण्य रद्द झालेच पाहिजेत. सरकारी रेकॉर्ड्सवर कुठेही सूरजागड प्रकल्प नावाची गोष्ट अस्तित्वात नसतांना राजकारणी कित्येक वर्षांपासून येथील बेरोजगार तरुणांना काल्पनिक सूरजागड प्रकल्पात रोजगार मिळणार म्हणून खोटी आश्वासने देत आले आहेत.

खासगी कंपन्यांना येथील बहुमूल्य खनिजांची लूट करता यावी, यासाठीच खाण सुरू करण्यासाठी आताच्या व अगोदरच्या लोकप्रतिनिधींनी ना हरकत प्रमाणपत्र दिले आहेत. हा सर्व प्रकार बंद करावा, अशीही मागणी यावेळी लावून धरण्यात आली.