पोकलेन, जेसीबी व ट्रक देण्यास वाहतूक व्यावसायिकांचा नकार

सुकमा येथील नक्षलवादी हल्ल्यानंतर धास्तावलेल्या लॉयड मेटल्स या कंपनीने सूरजागड येथील लोह उत्खनन तात्काळ बंद केले आहे. विशेष म्हणजे या हल्ल्यानंतर वाहतूक व्यावसायिकांनी पोकलेन मशीन, जेसीबी व ट्रक देण्यास स्पष्ट नकार दिल्याचे समजते. काही महिन्यांपासून सूरजागड प्रकल्पावर नक्षलवाद्यांची बारीक नजर आहे.

छत्तीसगडमधील सुकमा येथे नक्षलवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांवर केलेल्या हल्ल्यात २५ जवान शहीद झाले. या क्रूर हल्ल्यामुळे गडचिरोली जिल्ह्य़ात येणाऱ्या सूरजागड येथील लॉयड मेटल्स कंपनीने नक्षलवाद्यांच्या भीतीने लोह उत्खननाचे काम तातडीने बंद केले आहे. गेल्या दोन दिवसांपासून या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे काम झालेले नाही. सूरजागड प्रकल्पाला नक्षलवाद्यांचा तीव्र विरोध आहे. मात्र, त्यांच्या विरोधानंतरही कडक पोलीस बंदोबस्तात लॉयड मेटल्सने लोह उत्खननाना सुरुवात केली आहे. त्यामुळे चिडलेल्या नक्षलवाद्यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कंपनीचे ८३ ट्रक जाळले होते. तसेच मजुरांसह ट्रक चालक व इतरांना बेदम मारहणही नक्षलवाद्यांनी केली होती. ट्रक जाळपोळीनंतर दोन महिने काम ठप्प होते. मात्र, अलीकडेच पोलीस संरक्षणात पुन्हा लोह उत्खननाला सुरुवात झाली होती. लॉयडचे ट्रक रोज सकाळी आठ वाजता सूरजागड पहाडावर मजुरांसह दाखल होतात. सायंकाळी पाचपर्यंत उत्खननाचे काम चालते. त्यानंतर पोलीस संरक्षणात ट्रक पहाडाखाली येतात व पुढे रवाना होतात. असा दिनक्रम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. मात्र, सुकमा हल्ल्यानंतर परिस्थिती बदलली असून वातावरणात तणाव निर्माण झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून येथे काम बंद आहे. नक्षली हल्ल्यानंतर निर्माण झालेला तणाव सैलावल्यानंतरच काम सुरू होईल, असे सूत्रांनी सांगितले. लॉयडने काम बंद केले असले तरी कंपनीला नक्षलवाद्यांकडून धमक्या आल्याची विश्वसनीय माहिती आहे.

आदिवासी युवकाची हत्या

पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी धानोरा तालुक्यातील दुर्गापूर येथील सेवकराम हिचाकी या २६ वर्षीय युवकाची गोळय़ा घालून हत्या केली. मंगळवारी मध्यरात्री ही हत्या करण्यात आली. रात्री सशस्त्र नक्षलवादी दुर्गापूर येथे गेले. त्यांनी सेवकरामला झोपेतून उठवून गावाबाहेर नेले आणि त्याची गोळय़ा घालून हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह हटझर गावाजवळच्या रस्त्यावर नेऊन ठेवला. नक्षलवाद्यांनी सेवकरामच्या मृतदेहावर एक चिठ्ठीही ठेवली होती. या घटनेमुळे परिसरात आदिवासींमध्ये दहशतीचे वातावरण आहे.