24 February 2021

News Flash

भाडोत्री वाहन कंत्राटात अनियमितता

सद्य:स्थितीत असलेल्या वाहनांचा दर्जा योग्य नाही.

|| निखिल मेस्त्री

मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली; पाणीपुरवठा विभागात अजब प्रकार

पालघर: पालघर जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागात अनियमितता झाल्याचे प्रकार समोर आल्यानंतर आता भाडोत्री वाहन कंत्राटाच्या निविदा प्रक्रियेत अनियमितता झाल्याचे समोर येत आहे. या विभागात निविदा प्रक्रिया न राबवताच भाडोत्री वाहन पुरवणाऱ्या ठेकेदाराला थेट मुदतवाढ देऊन हे कंत्राट रेटून नेले जात आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी यासाठी नवीन निविदा प्रक्रिया राबविण्याच्या आदेशालाही कार्यकारी अभियंत्यांनी बगल दिली आहे.

या विभागात भाडोत्री वाहन ठेका चालविणारा ठेकेदार हा याच विभागाच्या कर्मचाऱ्याचा सख्खा भाऊ असल्याने त्यालाच हा ठेका वारंवार दिला जात असल्याचे आरोप होत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून हाच ठेकेदार वाहन ठेका घेत आहे. या विभागाने या ठेक्याच्या निविदा प्रक्रियेत एकाच ठेकेदाराकडे सात वाहने असणे आवश्यक असल्याच्या अटी-शर्ती बंधनकारक केल्या होत्या. मात्र, स्वत:च्या व अधिकारी वर्गाच्या फायद्याकरिता अशा अटी-शर्ती टाकल्या गेल्या असल्याची तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिले होते.

मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जुलै ते ऑगस्ट दरम्यान पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांना ही निविदा प्रक्रिया रद्द करायला सांगून या निविदा प्रक्रिया मधील ही अट रद्द करून नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्यात सांगितले होते. मात्र पाणीपुरवठा विभागाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आदेश अजूनपर्यंत पाळलेले नाहीत. याउलट निविदा प्रक्रिया न राबवता संबंधित ठेकेदाराला हे काम मुदतवाढ देऊन देण्यात आलेले आहे.

पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्याच्या भावाच्या नावावर हे भाडोत्री वाहन कंत्राट असले तरी या वाहनांच्या नोंदी व वाहनांच्या इतर कामकाजाच्या नोंदी ठेवण्याचे काम हा कर्मचारी स्वत:च्या हस्तलिखिताने करीत असल्याची चर्चा जिल्हा परिषदेत आहे. पाणीपुरवठा विभाग एका वाहनामागे सुमारे ५० हजार रुपये दरमहा मोजत असेल तर ते वाहनही त्याच दर्जाचे असणे अपेक्षित आहे. मात्र सद्य:स्थितीत असलेल्या वाहनांचा दर्जा योग्य नाही. याच किमतीत इतर विभागात चांगल्या दर्जाची वाहने ठेका पद्धतीने दिलेली आहेत.

भाडोत्री वाहनांसाठी  वर्षाला ४० लाख

पालघर जिल्ह्याच्या पाणीपुरवठा विभागात आता सुरू असलेल्या ठेकेदारामार्फत सात चार चाकी वाहने भाडोत्री तत्त्वावर लावण्यात आली आहे. याआधी ही वाहने निविदा प्रक्रिया राबवून ठेका देण्यात आला आहे. पाणीपुरवठा विभागात कामांच्या निविदा प्रक्रियेतून चार टक्के प्रशासकीय खर्च म्हणून भाडोत्री वाहनांसाठी दरवर्षी सुमारे ४० लाखांची तरतूद करण्यात आलेली आहे. एका वाहनकरिता सुमारे पन्नास हजार प्रतिमाह तर ३.५ लाख सात वाहनांसाठी खर्च  होत आहे.

शासनाच्या निधीचा अपव्यव

या कामाची निविदा प्रक्रिया राबवली न गेल्याने स्पर्धात्मक दराची निविदा भरली जात नाही व याचे नुकसान जिल्हा परिषदेला सोसावे लागत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून भाडोत्री कंत्राटी ठेका हा मुदतवाढीवर सुरू असल्याने पाणीपुरवठा विभाग मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाकडे कानाडोळा करीत असल्याचे दिसून येत आहे. तसेच या ठेकेदाराला दिलेले दर इतर ठेकेदारांच्या तुलनेत जास्त असल्याने हा विभाग शासनाच्या निधीचा अपव्यव करीत असल्यावरून प्रश्न उपस्थित होत आहेत. संबंधित अभियंत्यांना या बाबत विचारणा करण्यासाठी वारंवार संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिलेला नाही.

प्रशासकीय प्रमुखांच्या आदेशाला न जुमानणे ही खेदाची बाब आहे. पुनर्निविदा करण्याबाबत सूचना असतील तर त्या का केल्या नाहीत व मुदतवाढ देऊन कंत्राट का रेटले जात आहे, याची चौकशी होणे अपेक्षित आहे. – महेंद्र भोणे, सदस्य, विरोधी पक्ष, जि. प. पालघर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2021 12:24 am

Web Title: irregularities in rental vehicle contracts akp 94
Next Stories
1 जयंत पाटील यांची खेळी यशस्वी
2 नवापूरमध्ये बर्ड फ्लूने नुकसान
3 गोंडी भाषेतून शिक्षण देणारी राज्यातील पहिली शाळा गडचिरोलीत
Just Now!
X