03 April 2020

News Flash

नेर धामना प्रकल्पात कोटय़वधींचा गैरव्यवहार

अकोला जिल्हय़ातील तेल्हारा तालुक्यात नेर धामना हा सिंचन प्रकल्प आहे.

भाग १

मंगेश राऊत, लोकसत्ता

नागपूर : अकोला जिल्हय़ातील नेर धामना येथील सिंचन प्रकल्पाचे कंत्राट एका अपात्र कंत्राटदाराला देण्यात आले असून त्यातही कोटय़वधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हे कंत्राट मिळवण्यासाठी माजी खासदार अजय संचेती यांच्या कुटुंबातील मेसर्स एसएमएस कंपनीने बनवाबनवी केली असून त्यासंदर्भात अमरावतीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या विशेष तपास पथकाद्वारे (एसआयटी) चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अकोला जिल्हय़ातील तेल्हारा तालुक्यात नेर धामना हा सिंचन प्रकल्प आहे. त्याला ऑक्टोबर २००८मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली. प्रकल्पाकरिता १८१ कोटी १९ लाख रुपये खर्च ग्राहय़ धरण्यात आला होता. त्यानुसार, फेब्रुवारी २००९ मध्ये जाहिरात प्रसिद्ध करून निविदा मागवण्यात आल्या. नेर धामना  प्रकल्प उभारण्यात येणारा परिसर खारपाणपट्टा होता. अशा भागात सिंचन करता येत नाही. हा संपूर्ण सपाट भाग असून त्या ठिकाणी पाणी अडवण्याची नैसर्गिक संरचना नाही. अशा परिसरात सिंचन केल्यास दोन ते तीन वर्षांत जमिनीच्या पोटातील क्षार वर येऊन जमीन खराब होते. असे असतानाही हा सिंचन प्रकल्प लादण्याचा निर्णय विदर्भ सिंचन विकास महामंडळाने (व्हीआयडीसी) घेतला.

या ठिकाणी प्रकल्प उभारणीसाठी विशिष्ट स्वरूपाच्या आराखडय़ाची आवश्यकता होती. पण ‘व्हीआयडीसी’ने आपल्या मर्जीतील विशिष्ट कंत्राटदारांना काम मिळावे म्हणून अतिशय घाई केली. खारपाणपट्टय़ात सिंचन प्रकल्प उभारणीसाठी विशिष्ट प्रकारचा अनुभव आवश्यक असतो. या कंत्राटाकरिता ‘एम. एस. पाइप्स आणि रायझिंग मेन’चा अनुभव अपेक्षित होता. तसेच अनुभव प्रमाणपत्र पाच वर्षांमधील असणे आवश्यक असताना निविदा भरताना ‘मेसर्स एमएमएस इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड’ आणि ‘मे. डी. ठक्कर कन्स्ट्रक्शन प्रा. लिमिटेड’ या संयुक्त भागीदारीतील कंपनीने ‘एसएमएस’ कंपनीचे जुने अनुभव प्रमाणपत्र जोडले. पण ते १९९९-२००० या काळातील होते. हे प्रमाणपत्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने दिले होते आणि त्यात कोणत्या वर्षी त्यांनी काम केले, हे नमूद नव्हते. अशा बनवाबनवीच्या आधारावर हे कंत्राट मिळवण्यात आले.

दरम्यान, या संदर्भात माजी खासदार अजय संचेती यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

 

निविदेविना ३३२ कोटींचे अतिरिक्त काम

विदर्भ विकास महामंडळाने (व्हीआयडीसी) नोव्हेंबर २००८ आणि फेब्रुवारी २००९ मध्ये केंद्रीय जल आयोगाला पत्र लिहून नेर धामना येथील खारपाणपट्टय़ातील प्रकल्पासाठी आराखडा देण्याची विनंती केली होती. पण केंद्रीय जल आयोगाच्या आराखडय़ाची प्रतीक्षा न करताच निविदा मागवून कंत्राट देण्यात आले. २०१०-२०११ मध्ये केंद्रीय जल आयोगाने आराखडा पाठवला असता प्रकल्पाची किंमत ६३८ कोटी इतकी होणार होती. त्यानंतर ‘व्हीआयडीसी’ने प्रकल्पाची किंमत ५२१ कोटी २५० लाख इतकी केली. तोपर्यंत कंत्राटदाराने दीडशे कोटींची कामे केली होती. नवीन आराखडय़ानुसार काम करण्यासाठी अतिरिक्त कार्यादेश देणे आवश्यक होते. पण त्यासाठी निविदा न काढता सिंचन विभागाने केवळ एका पत्राद्वारे ३३२ कोटींचे अतिरिक्त काम एसएमएस कंपनीला दिले. त्यानंतरही जवळपास दोन वर्षे प्रकल्पाचे कामविना कार्यादेश सुरू होते, हे विशेष.

केवळ स्पर्धा दाखवण्यासाठी चार निविदा

’या प्रकल्पासाठी सिंचन विभागाने निविदा मागवल्या असता केवळ चार कंपन्यांनी निविदा भरली होती. यात मेसर्स अनोजकुमार अग्रवाल, मेसर्स एसएमएस इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड व मेसर्स डी. ठक्कर इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. (संयुक्त भागीदारी), मेसर्स एस. एन. ठक्कर कन्स्ट्रक्शन प्रा. लि. आणि मेसर्स सोमा इंटरप्रायजेस, पुणे यांचा समावेश आहे.

’त्यापैकी मेसर्स अनोजकुमार अग्रवाल यांची निविदा अपात्र ठरवण्यात आली. उर्वरित दोन निविदा भरणाऱ्या कंपन्यांचे संचालक आणि कर्मचारी जवळपास सारखेच होते. प्रकल्पाचे कंत्राट मिळवण्यासाठी एका कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या कंपनीच्या निविदेवर स्वाक्षरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

’दोन कंपन्यांच्या पत्रावरील संपर्काचा पत्ता आणि दूरध्वनी क्रमांक सारखाच असल्याचे दिसून येते. यावरून निविदा प्रक्रियेत स्पर्धा दाखविण्यासाठी अनेक कंत्राटे भरण्यात आल्याचे स्पष्ट होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2020 3:39 am

Web Title: irregularities in the irrigation project at ner dhamana dam akola zws 70
Next Stories
1 पाच वर्षांत सहा हजारांवर शेतकऱ्यांची आत्महत्या
2 मागील कामांच्या चौकशा करा, मात्र निर्णय अहवाल लवकर द्या – चंद्रकांत पाटील
3 वाईट प्रवृत्तींविरोधात लढण्याचे सामर्थ्य निर्माण करावे
Just Now!
X