मोहन अटाळकर, अमरावती

विदर्भातील तब्बल ३९ तालुक्यांमध्ये पावसाने सरासरी ओलांडली असली, तरी पावसाच्या दिवसांमधील अनियमिततेने अनेक भागांत पेयजल संकटाचे संकेत दिले आहेत. नागपूर विभागात आतापर्यंत ८९ टक्के तर अमरावती विभागात ९४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. पण, जून आणि जुलैत पावसाने मोठे खंड दिल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. विदर्भ हा लहरी पावसाचा प्रदेश बनत चालल्याचे हे चित्र आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून विदर्भाला कमी पावसाचा फटका बसत आहे. मान्सूनच्या पावसास सातत्याने उशिरा सुरुवात झाली. गेल्या दशकभरात किमान चार वर्षे या भागाला दुष्काळाने जवळ केले आहे. जून व जुलै महिन्यातील मृग व आद्र्रा या नक्षत्रात पाऊस बरसला नाही. यंदा तर पावसाला सुरुवात जुलैच्या शेवटच्या आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात झाली. मृग, आद्र्रा व पुनर्वसू या पावसाच्या नक्षत्राने जर दगा दिला तर खरीप हंगामाला मोठा मार बसतो. उडीद, मूग, कापूस ही पिके तग धरत नाहीत. पश्चिम विदर्भात खरीप पिकांमध्ये सर्वाधिक जागा आता सोयाबीनने घेतली आहे. सोयाबीन तसेच तूर व बाजरी यांसारखी पिके कशीतरी येतात. पण उत्पादकतेवर परिणाम होतो. विदर्भातील जवळजवळ ७० टक्क्यांपेक्षा जास्त पेरा हा खरिपाचा असतो आणि म्हणून खरीप हातून गेल्यामुळे शेतकरी डबघाईला येतो. नागपूर विभागात सर्वाधिक शेती ही धानाची आहे. त्यासाठी भरपूर पाऊस आवश्यक आहे. पण, यंदा धानाच्या पट्टय़ातील चंद्रपूर वगळता गोंदिया, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे.

विदर्भातील बहुतांश शेतकरी पर्जन्याधारितच शेती करतात व ज्यांना धरण व कालव्याच्या पाण्याचा आधार आहे त्यांनापण पाऊस न पडल्यामुळे जलाशयात पाणी नसते आणि खरीप पिकाला पाणी देऊ शकत नाहीत. गेल्या वर्षी  बुलढाणा जिल्ह्याला दुष्काळाचा भीषण फटका बसला. पिण्याच्या पाण्याचे हाल झाले. टँकरची संख्या ४०० चा आकडा ओलांडत होती तर वैरणीच्या भीषण टंचाईमुळे जनावरांना विकण्याची पाळी आली. पाणीटंचाईमुळे विदर्भातील बऱ्याच भागांत फळबागा वाळून गेल्या.

एकूण पावसापेक्षा पिकाच्या वाढीच्या कालावधीत गरजेनुसार पडणारा पाऊस महत्त्वाचा ठरतो. यंदा सरासरीपेक्षा पाऊस कमी पडणार आहे असे भाकीत वर्तविण्यात आले होते. चिंता करण्यासारखी बाब नाही असे सांगण्यात आले, पण पावसाच्या लहरीपणाचा फटका विदर्भातील सर्वच जिल्ह्यांना बसला.

अमरावती विभागात जून ते डिसेंबर या कालावधीतील पावसाची सरासरी ही ८६७ तर नागपूर विभागात ती १२३६ मि.मी. इतकी आहे. पण, ही सरासरी गाठणे गेल्या काही वर्षांमध्ये शक्य झालेले नाही. काही जिल्ह्यांमध्ये वार्षिक सरासरी एखाद्या वर्षी गाठली जाते, पण इतर जिल्हे हे तुटीचे राहतात.

जून ते सप्टेंबपर्यंतची अमरावती विभागाची सरासरी ७९२ आणि नागपूर विभागाची ११६१ मि.मी. आहे. आतापर्यंत अमरावती विभागात जून ते सप्टेंबरच्या सरासरीच्या तुलनेत ६० टक्के तर नागपूर विभागात ५९ टक्के पाऊस झाला आहे. दुष्काळी पट्टय़ात सरासरीपेक्षा १० ते २० टक्के पाऊस कमी झाला तर शेती कोलमडून पडते. सरासरीचे आकडे वास्तविकता दाखवत नाहीत. पाऊस कमी झाला म्हणजे नेमका जमिनीवर काय परिणाम झाला याला अनेक पदर आहेत. कमी पावसाच्या वर्षांत साधारणत: बऱ्याच वेळा पावसाला उशिरा सुरुवात होते. पाऊस लवकरच आटोपता घेतो. एकूण पाऊस कमी पडतो. कमी कालावधीत तीव्र पावसाचे फटके देऊन जमिनीवरून वाहून जातो व भूजलात वाढ करण्यास निकामी ठरतो.

अनेक वेळा जून-जुलैमध्ये पावसास सुरुवात होते. शेतकरी उत्साहाने व घाईने बाजारातून महागडे बी विकत घेतो व पेरणी करतो. मोड उगवतात व अचानक पाऊस ताण देतो. हा ताण काही आठवडय़ांचा असू शकतो. मोड सुकून जातात. मोसम गेल्यानंतर पुन्हा पाऊस पडतो. यंदादेखील हीच परिस्थिती शेतकऱ्यांनी अनुभवली. कमी पावसाच्या काळात बाष्पीभवन हा वैरी होऊन मागे लागत असतो. पावसाळा कमी झालेल्या वर्षी भूजलावर फार विपरीत परिणाम होतो. यंदाच्या वर्षी पावसास उशिरा सुरुवात होणे, पावसाळा लवकर संपणे, कोरडे खंड पडणे, बाष्पीभवनाचा वेग वाढणे याची शक्यता खूप आहे असे समजून शेतकऱ्यांनी आणि शासनाने यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर मात करण्यासाठी नियोजन करण्याची गरज आहे.

* अमरावती विभागात केवळ बुलढाणा जिल्ह्याने पावसाची सरासरी ओलांडली असून यंदा या जिल्ह्यात आतापर्यंत १०३ टक्के, अकोला ८७ टक्के, वाशीम ८८ टक्के, अमरावती ९७ तर यवतमाळ जिल्ह्यात ९२ टक्के पाऊस झाला आहे.

* नागपूर विभागात केवळ चंद्रपूर जिल्ह्याने सरासरी गाठली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात १०३ टक्के, वर्धा ९२ टक्के, नागपूर ९५ टक्के, भंडारा ७९ टक्के, गोंदिया ७५ टक्के आणि गडचिरोली जिल्ह्यात ९४ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

* अमरावती विभागात आतापर्यंतच्या सरासरीच्या तुलनेत ९४ टक्के म्हणजे ४७३ मि.मी. पाऊस झाला आहे. याच कालावधीत गेल्या वर्षी ८२ टक्के पाऊस पडला होता. नागपूर विभागात ८९ टक्के म्हणजे ६६६ मि.मी. पाऊस झाला असून गेल्या वर्षी ८३ टक्के पावसाची नोंद झाली होती.

* गेल्या वर्षी विदर्भात जून महिन्यात सरासरी बारा दिवसांचा, जुलैत २० दिवस, ऑगस्टमध्ये १० दिवस तर सप्टेंबरमध्ये केवळ पाच दिवसांचा पाऊस झाला. यंदादेखील पावसाचे दिवस कमी असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.