प्रबोध देशपांडे

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामध्ये आरोप झाल्यानंतर १५ दिवसांनी वनमंत्री संजय राठोड यांनी पोहरादेवी येथे जनतेसमोर येत मोठे शक्तिप्रदर्शन केले. पश्चिम विदर्भात कोविड संसर्गाचा उद्रेक होत असतांना वनमंत्र्यांनी बेजबाबदारपणे केलेले शक्तिप्रदर्शन करोना वाढीला हातभार लावणारे ठरले आहे. वाशीम जिल्हय़ात गेल्या दोन दिवसांत करोनाचा प्रादुर्भाव चांगलाच वाढला. पोहरादेवी येथेसुद्धा एका महंतांच्या कुटुंबासह अनेक बाधित आढळून आले आहेत.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून वनमंत्री व शिवसेना नेते संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप झाल्यानंतर सुमारे १५ दिवस ते संपर्कात नव्हते. जनतेसमोर येऊन आपल्यावरील आरोपांना उत्तर देण्यासाठी त्यांनी बंजारा समाजाची काशी पोहरादेवी गड या पवित्र स्थानाची निवड केली. सुमारे चार दिवस अगोदरपासून त्यांच्या दौऱ्याचे नियोजन करण्यात आले. समाज माध्यमातील विविध समूहांमध्ये विशिष्ट संदेश फिरून संजय राठोड यांच्या समर्थनार्थ पोहरादेवी येथे एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले. या ठिकाणी जोरदार शक्तिप्रदर्शन करून दबावगट निर्माण करण्याचा प्रयत्न होता. संजय राठोड यांच्या दौऱ्याची चांगलीच चर्चा होती. २३ फेब्रुवारीला सकाळी संजय राठोड दारव्हा येथून पोहरादेवी येथे दाखल होण्यापूर्वीच त्यांच्या समर्थकांची रीघ लागली. विशेष म्हणजे वाशीम जिल्हय़ात जमावबंदीचे आदेश लागू होते. तरीही १० ते १२ हजार समर्थकांनी पोहरादेवी येथे एकच गर्दी केली. विविध ठिकाणावरून हे समर्थक त्या ठिकाणी आले होते. परिस्थिती आटोक्याबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनाही सौम्य लाठीमार करावा लागला. सामाजिक अंतर नियमाचा फज्जा उडाल्याचे सर्वत्र चित्र होते. हे सर्व करताना करोना संसर्ग वाढीच्या भीषण परिस्थितीचा कुठेही विचार करण्यात आला नाही. करोना आपत्तीत समर्थनाच्या नावावर समाजाच्या हजारो लोकांना एकत्र करत त्यांचा जीव धोक्यात टाकण्याचा प्रकार सर्रासपणे घडला. या गर्दीमुळे करोना संसर्ग अधिक वेगाने पसरण्याची भीती व्यक्त केली जात होती. ती आता खरी होत असल्याचे दिसून येते. गेल्या दोन दिवसांत जिल्हय़ात करोना रुग्ण वाढीचा आकडा चांगलाच फुगला. काल ३१८ रुग्ण आढळले असून आजही दोनशेपेक्षा अधिक बाधितांची भर पडली. पोहरादेवी येथील एका महंतासह त्यांच्या कुटुंबातील चार जणांना करोनाची लागण झाली. संजय राठोड पोहरादेवी येथे आले असतांना ते महंत दिवसभर त्यांच्या सोबत होते. गावातील इतरही काही जणांना बाधा झाली. अनेकांना करोनाची प्राथमिक लक्षणे आढळून येत असल्याची माहिती आहे. त्यामुळे प्रशासनाकडून विशेष मोहीम राबवून तपासणी करण्यात येत आहे. करोना संसर्ग अधिक पसरण्यासाठी वनमंत्र्यांचे शक्तिप्रदर्शन कारणीभूत ठरल्याचा आरोप होत आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी गर्दी करू नये व कुठलाही कार्यक्रम न घेण्याचे जाहीर आवाहन केले होते. मात्र, त्यांच्याच मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला केराची टोपली दाखवत पोहरादेवी येथे नियमांना तिलांजली दिली. या प्रकरणी जोरदार टीका झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले. वाशीम पोलिसांनी १० जणांसह या ठिकाणी उपस्थित असलेल्या ८ ते १० हजार लोकांवर गुन्हा दाखल केला. यामध्ये मंत्र्यांचा समावेश नाही. या प्रकरणात पोलीस देखील कोंडीत सापडले आहेत. करोनाच्या प्रादुर्भावामुळे जमावबंदीचा आदेश असल्याने पोलिसांनी अगोदरच नोटीस बजावल्या होत्या. तरीही कायदा व नियमाला झुगारून हजारो समर्थक पोहरादेवी येथे एकत्र आले. आता कारवाई करावी कुणावर? असा पेच पोलिसांपुढे निर्माण झाला. अखेर त्यांनी हजारो लोकांवर गुन्हा दाखल करून वेळ निभावून नेली. पोहरादेवी येथील गर्दीसाठी कोण जबाबदार हे उघड गुपित आहे. त्यांच्यावर नेमकी कारवाई होणार का? हा खरा प्रश्न आहे.

शेते तुडवत पोहरादेवी गाठले वाशीम जिल्हय़ात जमावबंदीचे आदेश असल्याने पोहरादेवी येथे येऊ नये, असे आवाहन महंतांसह प्रशासनाकडून करण्यात आले होते. पोहरादेवीच्या मार्गावर अनेक ठिकाणी पोलिसांनी अडवून लोकांना परत पाठवले. तरीही असंख्य लोकांनी रस्त्याने न येता शेताने चालत जाऊन पोहरादेवी गाठले. करोनाचा कहर सुरू असतांनाही हजारो लोक येथे एकत्र आले होते.

पोहरादेवी येथील गर्दी प्रकरणात १० जणांसह ८ ते १० हजार लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रत्यक्ष घटनास्थळाच्या छायाचित्रणाची तपासणी करण्यात येत आहे. प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

– वसंत परदेशी, जिल्हा पोलीस अधीक्षक, वाशीम.