पहिल्या वेळी मानवतेच्या भावनेतून पिण्यासाठी भंडारदरा-निळवंडय़ातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात आले. मात्र या वेळी केवळ न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी पाणी सोडले गेले. अर्थात पाटबंधारे खात्याचे अधिकारी, सरकारी वकील न्यायालयात बाजू मांडण्यात कमी पडले असावेत, असे मत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याच्या ४५ व्या वार्षिक सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष माधवराव कानवडे होते. आमदार डॉ. सुधीर तांबे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष बाजीराव खेमनर, पंचायत समितीच्या सभापती सुरेखा मोरे, दूध संघाचे अध्यक्ष आर. बी. राहाणे, बाजार समितीचे सभापती अनिल देशमुख, शेतकी संघाचे अध्यक्ष शिवाजीराव थोरात, कारखान्याचे कार्यकारी संचालक अनिल शिंदे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
थोरात म्हणाले, साखर कारखाना, दूध संघ वजा करून तालुक्याचे चित्र नजरेसमोर आणा. आजूबाजूच्या तालुक्याशी आपली तुलना करून पाहा, म्हणजे आपले किती चांगले आहे हे लक्षात येईल. आपल्या सर्व संस्था तालुक्याला आर्थिक सुबत्ता देत आहेत. कार्यक्षेत्राबाहेरील दूरदूरचे शेतकरी झळ सोसून आपल्याला ऊस देतात, हे आपल्यावरील विश्वासाचे प्रतीक आहे. जवळपास निम्मा ऊस बाहेरचा आणावा लागतो. काटकसर, पारदर्शी कारभारामुळेच आपल्या संस्था यशस्वी झाल्या आहेत. दुष्काळावर मात करण्यासाठी सरकारी टँकर सुरू आहेत. मात्र जेथे टँकर पोहोचत नाही, तेथे आपल्या दूध संघाचा टँकर तासाभरात पाणी घेऊन पोहोचतो, अशी व्यवस्था राज्यात कोठेही पाहायला मिळणार नाही. एवढा दुष्काळ असूनही त्याचा परिणाम तालुक्याच्या दूध संकलनावर झाला नाही, ही कौतुकाची गोष्ट आहे. त्याचबरोबर चिकाटीने केलेली शेततळ्यांची निर्मिती ही येथील शेतकऱ्याच्या कष्टाची ग्वाही देते.
कानवडे म्हणाले, राज्यात प्रथम खासगी कारखानेच होते. मात्र त्यांच्याकडून होणारी पिळवणूक थांबविण्यासाठी सहकारी चळवळ निर्माण झाली. आता पुन्हा खासगी कारखान्याचे वारे वाहू लागले आहेत. त्यांच्याकडून अनेक प्रलोभने दाखविली जातील. सहकार मोडीत काढून पुन्हा तुमचे शोषण करायला खासगीवाले टपले आहेत, त्यामुळे आपला कारखाना टिकविला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. या वेळी आमदार डॉ. सुधीर तांबे यांचेही भाषण झाले.