निम्नपांझरा अक्कलपाडा धरणाच्या डाव्या कालव्याचे काम काही ठिकाणी प्रलंबित असून त्यास जिल्हा प्रशासनासह तापी पाटबंधारे विभागाशी संबंधित सर्व वरिष्ठ अधिकारी जबाबदार आहेत. हे अपूर्ण काम ३० जूनपर्यंत सुरू न केल्यास जिल्हाधिकाऱ्यांसह पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांना लाभक्षेत्रातील गावात प्रवेश बंदी लादून एक जुलैनंतर धुळे-साक्री रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा आ. प्रा. शरद पाटील यांनी पत्रकान्वये दिला आहे. निम्नपांझरा अक्कलपाडा प्रकल्पाच्या मुख्य धरणाचे काम १०० टक्के पूर्ण झाले असून या धरणाच्या अपूर्ण कामासाठी लागणाऱ्या निधीची शासनस्तरावर पाठपुरावा करून तरतूद करून घेण्यात आली आहे. राज्य शासनाच्या मुख्य व पुरवणी अर्थसंकल्पात अनुक्रमे ३८.५० कोटी आणि १६.५० कोटी अशा ५५ कोटी रुपयांची तरतूद २०१४-१५ साठी करण्यात आली आहे.
डाव्या कालव्याच्या ० ते ५०० किलोमीटर अंतरासाठी आणि राज्य महामार्ग सहा ओलांडून कालवा वळविम्यासाठी अडीच ते पाच कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. शिवाय जुनी देयके देणे तसेच बुडीत क्षेत्रातील लोकांना वाढीव मोबदला देणे, अपूर्ण कामांची पूर्तता करणे यासाठी यंदा तरतूद करण्यात आलेला निधी पुरेसा आहे. अक्कलपाडा प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करावे अशी लाभक्षेत्रातील ग्रामस्थांची मागणी आहे. असे असताना कोणाच्यातरी राजकीय दबावाला बळी पडत डाव्या कालव्याच्या कामात अधिकारी जाणीवपूर्वक वेळ घालविताना दिसत आहेत. अधिकारी स्तरावर मुद्दाम दिरंगाई करून काम लांबविण्यात येत असल्याची शंका आता लाभक्षेत्रातील लोकांच्या मनात उपस्थित होऊ लागली आहे.
गेल्या तीन वर्षांत दुष्काळी व टंचाई परिस्थितीत चार वेळा पाणी मिळाल्यामुळे जनतेला या प्रकल्पाचे महत्व पटले आहे. सध्या जून संपत आला तरी पाऊस नाही. हीच परिस्थिती पुढे काही दिवस कायम राहिल्यास अक्कलपाडा धरणात अडविलेले पाणी शेती व पिण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे डाव्या कालव्याचे काम व पुनर्वसनाची अपूर्ण कामे तातडीने सुरू करावीत अशी मागणी आहे.