राज्यात ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा झाला. सिंचनाची कामे केवळ कागदावरच झाली आहेत. प्रत्यक्षात हे सर्व पैसे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खिशात गेले, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केला. नंदुरबार जिल्ह्णाातील शहादा येथे भाजपतर्फे बुधवारी आयोजित सभेत ते बोलत होते. या वेळी फडणवीस यांनी नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांची तुलनाच होऊ शकत नसल्याचे सांगितले.
संकटकाळी सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाणारा भाजप हा एकमेव पक्ष आहे. अण्णा हजारे यांनी लोकपाल विधेयकासंबंधी छेडलेल्या आंदोलनाचा प्रश्न असो की, दिल्लीतील निर्भया प्रकरण अथवा उत्तराखंडमधील नैसर्गिक आपत्ती असो. या सर्व घटनांच्या वेळी राहुल गांधी जनतेला सामोरे गेले नाहीत. परिणामी, ते तरूणांचे आशास्थान बनू शकले नाहीत. याउलट नरेंद्र मोदींनी गुजरात राज्य हे विकासाचे प्रतीक म्हणून देशवासीयांसमोर सादर केले. तसेच कोणत्याही आपत्तीस ते धैर्याने सामोरे गेले, असा दावा फडणवीस यांनी केला. सर्वत्र दलाल संस्कृती निर्माण झाली असून, त्याचा फटका शेतकऱ्यांनाही बसला आहे. कष्ट शेतकरी करतो आणि दलाल गब्बर होतात. व्यापाऱ्यांकडे माल गेल्यावरच शेतीमालाचे भाव गगनाला भिडतात. शेतकरी शेतमाल बाजारात आणतो, नेमके तेव्हाच शेतीमालाचे भाव का गडगडतात, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.