जलसंपदा विभागाचा अनागोंदी कारभार चव्हाटय़ावर आणून प्रकाशझोतात आलेले ‘मेटा’चे मुख्य अभियंता तथा तांत्रिक सल्लागार समितीचे सदस्य विजय बळवंत पांढरे हे राजकारणात प्रवेश करण्याच्या मार्गावर आहेत. ३० नोव्हेंबरला शासकीय सेवेतून निवृत्ती स्वीकारल्यानंतर ते आपली राजकीय भूमिका जाहीर करतील. या संदर्भात १ डिसेंबरला माहिती दिली जाईल, असे म्हटले आहे.
राजकीय नेते, ठेकेदार आणि भ्रष्ट अधिकारी यांच्या साखळीमुळे सिंचनाच्या कामावर दशकभरात खर्ची पडलेल्या एकूण निधीपैकी तब्बल ३५ हजार कोटींचा निधी पाण्यात गेल्याची बाब पांढरे यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. सिंचन प्रकल्पांच्या कामात कोणाकोणाचे अन् कसे उखळ पांढरे झाले, याची माहिती त्यांनी पत्रांद्वारे मांडली. याची परिणती तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्यात झाल्यावर पांढरे हे तमाम महाराष्ट्र आणि देशात ओळखले जाऊ लागले. तेव्हाच आम आदमी पक्षाची त्यांच्यावर नजर पडली. या पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी पांढरेंची भेट घेऊन त्यांना आम आदमी पक्षात आणण्यासाठी प्रयत्न चालविले होते.