सध्या सुरू असलेल्या इंधन दर वाढीवरून महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आक्रमक भूमिका घेत, मोदी सरकारवर जोरदार टीका केली. याचबरोबर त्यांनी अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्यावर देखील निशाणा साधला. काँग्रेस सरकारच्या काळात इंधन दराबाबत ट्विट करणारे आता गप्प का? असा सवाल करत, महाराष्ट्रात अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन यांचे सिनेमे आणि शुटिंग बंद पाडण्याचा इशारा दिला आहे. यावरून भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी नाना पटोलेंवर जोरदार टीका केली आहे.

“…तेव्हा इंधन दरवाढीवर ट्विट करणारे अमिताभ-अक्षयकुमार आता गप्प का?”

“नाना पटोले काँग्रेस महाराष्ट्रात आणीबाणी लागू करणार आहे का? सत्ता तुमची असली तरी तुमची मनमानी चालणार नाही. देश घटनेच्या चौकटीत आणि कायद्यानुसार चालतो, तुमच्या मर्जीवर नाही. राज्य कायद्याचे आहे पप्पा किंवा पप्पूचे नाही.” असं भातखळकर म्हणाले आहेत.

तर, “डिझेल, पेट्रोल आणि गॅसची दरवाढ यामुळे सर्वसामान्यांचं जगणं कठीण झालं आहे. ज्यावेळी मनमोहन सिंग यांचं सरकार होतं तेव्हा अमिताभ, अक्षय कुमार ट्विटरच्या माध्यमातून टिवटिव करायचे आणि टीका करायचे. आज ते का शांत आहेत?,” अशी विचारणा नाना पटोले यांनी केलेली आहे.

“महाराष्ट्रात अक्षय कुमार आणि अमिताभ यांचे सिनेमे बंद पाडू”; नाना पटोलेंचा इशारा

याशिवाय, “अमिताभ आणि अक्षय कुमार यांचे सिनेमे आणि शुटिंग महाराष्ट्रात चालू देणार नाही. ज्या पद्धतीने ते लोकशाही मार्गाने मनमोहन सिंग यांचं सरकार असताना ट्विट करत होते त्याप्रमाणे आजही मोदी सरकारच्या देशविरोधी धोरणाच्या विरोधात त्यांनी आपली भूमिका मांडावी. अन्यथा महाराष्ट्रात सिनेमे आणि शुटिंग बंद पाडू अशी व्यवस्था करणार आहोत”. असा इशाराही त्यांनी दिलेला आहे.