भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या वाहन ताफ्यावर आज पश्चिम बंगालमध्ये विटा आणि दगडांनी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात भाजपाचे काही नेते जखमी झाल्याचेही सांगितले जात आहे. या घटनेवरून भाजपाने आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेस अध्यक्ष ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करणं सुरू केलं आहे. या हल्ल्याचे पडसाद आता सर्वत्र उमटत असल्याचे भाजपा नेत्यांच्या प्रतिक्रियेवरून दिसत आहेत. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील या हल्लाचा निषेध नोंदवत, ट्विटद्वारे याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

आमचे भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा व कैलाश विजयवर्गीय यांच्या वाहन ताफ्यावर झालेला हल्ला हा टीमसीच्या गुंडांनी केलेले अतिशय निंदनीय व लज्जास्पद असे कृत्यं आहे. आम्ही याचा तीव्र निषेध करतो व दोषींवर कठोर कारवाईची मागणी करत आहोत. ममतादीदी हीच लोकशाही आहे का? असं फडणवीस यांनी ट्विट्द्वारे म्हटलं आहे.

तर, तृणमूलच्या गुंडांनी भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर हल्ला केला. जे पी नड्डा हे या हल्ल्यात थोडक्यात बचावले. देशाच्या जनतेने पंतप्रधान मोदींना दिलेलं समर्थन पाहून विरोधकांचं गोंधळ उडणं स्वाभाविक आहे. भाजपा अशा भ्याड हल्ल्यांना कधीही घाबरला नाही आणि घाबरणारसुद्धा नाही. असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

ममता बॅनर्जी सरकारच्या सुरक्षेत त्रुटी असल्याचा आरोप यावेळी भाजपा नेत्यांनी केली असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यासंबंधी अहवाल मागवला आहे.

जे पी नड्डा यांच्या ताफ्यातील कारचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेला असून यामध्ये कारवर विटा आणि दगडांनी हल्ला करत काचा फोडल्याचं दिसत आहे. हल्ल्यात पक्षाचे नेते मुकूल रॉय आणि कैलाश विजयवर्गीय जखमी झाल्याचं जे पी नड्डा यांनी सांगितलं आहे. भाजपा नेते कार्यकर्त्यांना संबोधित करण्यासाठी जात असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.