करोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्या १०८ वर्षीय आजीबाईंची सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी भेट घेतली आणि त्यांचा साडीचोळी देऊन सत्कारही केला. करोनाचा कहर सुरु असताना आजीबाईंनी सर्व काळजी घेत स्वतःला करोनाची लागण होऊ दिली नाही, त्याचबरोबर लसींचे दोन्ही डोस घेत सामाजिक संदेश दिल्याची भावना पाटील यांनी व्यक्त केली आहे.

सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूर इथल्या १०८ वर्षीय जरीना आजी यांनी करोना प्रतिबंधक लसींचे दोन्ही डोस घेतले. त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी त्यांचा सत्कार केला. मंत्री जयंत पाटील हे आपल्या मतदारसंघात बरेच लोकप्रिय आहेत. त्यामुळे मंत्री जयंत पाटील यांना पाहताच जरीना आजीने ‘लवकर आलास…’ अशी हाक देत मायेनं विचारपूसही केली.


जरीना आजीने लसीचे दोन्ही डोस पूर्ण करुन लढण्याची आणि जगण्याची जिद्द काय असते हे दाखवून दिलं. त्यामुळे लसीकरण हेच करोनावरील प्रभावी शस्त्र असल्याने प्रत्येकाने लस घ्यावी आणि करोनाला पराभूत करावे असे आवाहनही पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले आहे.

पाहा फोटो- कमाल… १०८ व्या वर्षी करोनाच्या दोन्ही लसी घेणाऱ्या आजींचा झाला जाहीर सत्कार

दरम्यान, राज्यातली करोनाची दुसरी लाट आता ओसरताना दिसत आहे. दिवसेंदिवस करोना बाधितांची संख्या घटत आहे. तर देशातली करोना रुग्णांची संख्याही घटलेली दिसत आहे.  देशात गेल्या २४ तासात२,४२७ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला. देशात प्रथमच करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या तीन हजारांहून खाली आली आहे. आत्तापर्यंत देशातल्या तीन लाख ४९ हजार १८६ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातला मृत्युदर आता १.२१ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.

आणखी वाचा- Coronavirus: मृतांची संख्या प्रथमच तीन हजारांच्या खाली, करोनामुक्तांची संख्या नव्या बाधितांपेक्षा जास्तच!

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत १३ लाख ९० हजार ९१६ नागरिकांनी करोना प्रतिबंधक लस टोचून घेतली. त्यापैकी १३ लाख ११ हजार १६१ नागरिकांनी पहिला तर ७९ हजार ७५५ नागरिकांनी करोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला आहे. त्यामुळे आता लस घेतलेल्या नागरिकांची एकूण संख्या २३ कोटी २७ लाख ८६ हजार ४८२ वर पोहोचली आहे.