|| रमेश पाटील

वाडा : तालुक्यातील देवघर या छोटय़ाशा गावात पारंपरिक भातशेतीला व रब्बी हंगामातील अन्य पिकांना दूर ठेवत पिवळ्या कलिंगडाचा तसेच पिवळ्या व लाल रंगाच्या शिमला मिरचीच्या उत्पादनाचा यशस्वी प्रयोग करण्यात आला आहे. यासाठी इस्राइलचे कृषीतंत्रज्ञान वापरण्यात आले आहे.

कायम तोटय़ात जाणाऱ्या भातशेतीने इथला शेतकरी पिचला आहे. अशीच परिस्थिती तालुक्यातल्या देवघर गावातील पदवीधर असलेल्या प्रफुल्ल पाटील या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांची झाली होती. मात्र त्यावर मात करत त्याने आपल्या पाच एकर शेतीत पिवळ्या कलिंगडाची लागवड करून पालघर जिल्ह्य़ात नवा प्रयोग यशस्वी केला आहे. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मागील वर्षी शेतकऱ्यांना शेतीच्या अभ्यासासाठी इस्राइलला पाठवले होते. त्या गटात जाण्याची संधी प्रफुल्ल पाटील यांना मिळाली होती. इस्राइलमधील शेतीच्या तंत्रज्ञानावर आधारित शेती करताना गुंतवणूकही मोठी होती. त्यांनी गावातील सेवा सहकारी सोसायटीकडून कर्ज घेतले. संपूर्ण पाच एकराला ठिबक सिंचनाची व्यवस्था केली. कलिंगडाच्या लागवडीबरोबरच नेटशेड उभारून त्यात सिमला मिरचीचीही लागवड केली.