वाशी तालुक्यातील इसरूप-खानापूर येथील ४० शेतकरी गारपिटीच्या अनुदानापासून वंचित राहिले आहेत. पडीक जमिनी असलेल्या शेतकऱ्यांना सरकारच्या अनुदानाचा लाभ मिळाला. खरे व गरजू शेतकरी मात्र या अनुदानास मुकले. तलाठय़ांच्या सदोष पंचनाम्यामुळे ४० शेतकऱ्यांना अनुदानास मुकावे लागले.
फेब्रुवारी-मार्चमध्ये वाशी तालुक्यासह इसरूप व खानापूर या गावांना अवकाळी पाऊस, गारपिटीचा फटका बसला. गारपिटीमुळे या गावांतील शेतकऱ्यांची रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा तसेच फळपिके उद्ध्वस्त झाली. सरकारने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यास पिकांच्या पंचनाम्याचे आदेश दिले. मात्र, तलाठय़ांच्या पंचनाम्यात येथील ४० शेतकरी वगळले गेले. तलाठय़ाच्या मनमानी पद्धतीने केलेल्या पंचनाम्यामुळे शेतकऱ्यांवर मोठा अन्याय झाला.
याच गावातील अशा शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम मिळाली, की ज्या जमिनीवर कधी काळी कुळव फिरला नाही. चक्क पडीक जमीनधारक शेतकऱ्यांना तलाठय़ाच्या ‘कृपे’ने अनुदानाचा लाभ मिळाला आहे. परंतु अल्पभूधारक व गरीब शेतकऱ्यांना मात्र अनुदानापासून वंचित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे वंचित शेतकऱ्यांतून महसूल विभागाच्या भोंगळ कारभाराबद्दल संताप व्यक्त होत आहे.
अनुदानास मुकलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा, या साठी अण्णा हजारे प्रणीत भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन न्यास वाशी शाखेतर्फे मंगळवारी ४० शेतकऱ्यांच्या सह्य़ा असलेले निवेदन नायब तहसीलदार अतुल वाघमारे यांना दिले. वगळलेल्या शेतकऱ्यांनाही तातडीने अनुदान मिळावे, अशी मागणी निवेदनात केली आहे. भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन समितीचे अध्यक्ष बळिराम जगताप, कार्याध्यक्ष दादासाहेब चेडे, संघटक बापू कदम, शेतकरी गंपू जाधवर, भारत जाधवर, जािलदर जाधवर, हरिभाऊ कोल्हे आदी उपस्थित होते. ४० शेतकऱ्यांना अनुदान न मिळाल्यास समितीच्या वतीने बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही निवेदनात दिला आहे.