News Flash

मासिक सभेच्या लेखावहीत घोटाळा?

ग्रामपंचायतीतील नागरिकांना मासिक सभेला बसू न देणे, करोना काळातील खरेदी चौकशी अशा अनेक चौकशीच्या फेऱ्यात असलेली चिंचणी ग्रामपंचायतमध्ये आता एका वेगळ्या विषयामुळे चर्चेला आली आहे.

ग्रामपंचायतमधून बदली केलेले ग्रामसेवक नीलेश जाधव यांनी मासिक सभेची लेखा वही (प्रोसिडिंग बुक) लिहिताना ठिकठिकाणी काही जागा कोरी ठेवल्याने सदस्यामार्फत संशय व्यक्त होत आहे.

चौकशीच्या फेऱ्यात असलेली चिंचणी ग्रामपंचायत पुन्हा चर्चेत

लोकसत्ता वार्ताहर

पालघर : ग्रामपंचायतीतील नागरिकांना मासिक सभेला बसू न देणे, करोना काळातील खरेदी चौकशी अशा अनेक चौकशीच्या फेऱ्यात असलेली चिंचणी ग्रामपंचायतमध्ये आता एका वेगळ्या विषयामुळे चर्चेला आली आहे. ग्रामपंचायतमधून बदली केलेले ग्रामसेवक नीलेश जाधव यांनी मासिक सभेची लेखा वही (प्रोसिडिंग बुक) लिहिताना ठिकठिकाणी काही जागा कोरी ठेवल्याने सदस्यामार्फत संशय व्यक्त होत आहे.

मासिक सभा असताना सभेत ठरलेले विषय व झालेले ठराव याच्या नोंदी या लेखावहीत ग्रामपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी ग्रामसेवक यांनी नोंदवून ठेवणे अपेक्षित आहे. मात्र, या नोंदी घेत असताना तत्कालीन ग्रामसेवक नीलेश जाधव यांनी २६ जानेवारी २०२१ रोजी झालेल्या ग्रामपंचायत कार्यकारिणीच्या मासिक सभेमधील विषय या नोंदवहीत नोंदवताना अनेक ठिकाणी जागा रिक्त ठेवलेली आहे. इतकेच नव्हे तर या नोंदीमध्ये पूर्ण पानेही रिक्त ठेवल्याचे दिसून येत आहे. या ग्रामसेवकाने हे काम सरपंच यांच्या संगनमताने केल्याचे आरोप ग्रामपंचायत सदस्य करीत आहेत.

या पाश्र्वभूमीवर सभेची नोंदवही यांची फेर तपासणी करून घेतलेले विषय व त्या नोंदवहीवर असलेले ठराव यांचीही शहानिशा करावी व संबंधित ग्रामसेवक यांनी त्यांच्या कामात कसूर केल्याप्रकरणी त्यांच्यावर चौकशी व्हावी, अशी मागणी ग्रामपंचायतीच्या सदस्यांमार्फत समोर येत आहे.

तडकाफडकी बदली

संबंधित ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामसेवक यांनी संगनमताने ग्रामपंचायतीत अनेक अनियमितता व चुकीची कामे केल्याचे आरोप गावकऱ्यांनी व सदस्यांनी ठेवले होते. त्यानंतर ग्रामसेवक नीलेश जाधव यांनी गैरप्रकार केल्यामुळे त्यांची तक्रार ग्रामस्थ व सदस्यांनी विविध स्तरांवर केली होती. अलीकडेच जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नीलेश सांबरे यांच्याकडे नागरिकांनी गाऱ्हाणी घेऊन गेल्यानंतर ग्रामसेवक जाधव यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असल्याचे सदस्यांनी म्हटले आहे.

मासिक सभेच्या नोंदवही काही ठिकाणी कोऱ्या ठेवल्यामुळे यामध्ये गैरव्यवहार झाल्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी व्हावी व त्या अनुषंगाने ग्रामसेवक यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित आहे

– नितेश दुबळा, सदस्य, प्रभाग क्रमांक ५ अ

संबंधित प्रकरणाची तक्रार आलेली नाही.पुढे ही तक्रार आल्यास त्याची चौकशी व शहानिशा करून योग्य ती कार्यवाही केली जाईल.

– टी. ओ. चव्हाण, उप मुख्य कार्यकारी अधिकारी,ग्रामपंचायत

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2021 4:44 am

Web Title: issue in monthly meeting note book dd 70
Next Stories
1 अखेर ‘त्या’ लग्न सोहळ्याप्रकरणी कारवाईचे आदेश
2 शहरबात : उशाला धरण, घशाला कोरड
3 राज्यातील १२ हजार ग्रंथालये संकटात
Just Now!
X