News Flash

पेट्रोल पंपावरील कारवाई प्रकरण : ठाणे पोलिसांना वाहतूक व्यावसायिकाची साथ

इंधन चोरी प्रकरणात ठाणे गुन्हे शाखेने राज्यभरातील पेट्रोल पंपांवर छापे टाकले होते.

(संग्रहित छायाचित्र)

इंधन चोरी करणाऱ्या पेट्रोल पंप मालकांवरील कारवाई प्रकरणात ठाणे पोलिसानी पंप मालकांकडून अवैध वसुली केल्याचा आरोप गाजत असतानाच या प्रकरणात नागपुरातील एका वाहतूक व्यावसायिकाने पोलिसांसाठी मध्यस्थी केल्याची माहिती पुढे आली आहे.

इंधन चोरी प्रकरणात ठाणे गुन्हे शाखेने राज्यभरातील पेट्रोल पंपांवर छापे टाकले होते. या प्रकरणात कारवाईच्या आड पोलिसांनी अवैध वसुली केल्याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. पेट्रोल पंप मालकांनी पोलिसांच्या कारवाईला उच्च न्यायालयातही आव्हान दिले होते. न्यायालयाने कारवाईला स्थगिती देत ठाणे पोलिसांना स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश दिले. या घडामोडीमध्ये नागपुरातील एका ट्रॅव्हल्स व्यावसायिकाची भूमिका संशयास्पद आहे. या छापे सत्रादरम्यान ठाणे पोलीस या व्यावसायिकाच्या सतत संपर्कात होते. पोलीस पेट्रोल पंप मालकांना या व्यावसायिकाला भेटण्यास सांगत होते. हवालाच्या माध्यमातून काही देवाणघेवाणीचे व्यवहार झाल्याची ही माहिती पुढे येत आहे. दरम्यान, या प्रकरणात इंडियन ऑईल कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांवरही संशयाची सूई फिरत आहे. त्यांची पेट्रोललियम मंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली आहे. ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सर्व आरोप निर्थक असल्याची प्रतिक्रिया यापूर्वीच दिली आहे.

पेट्रोल पंपांवरील तांत्रिक घोळ उघडकीस आणण्याच्या कारवाईच्या नावाखाली ठाणे पोलिसांनी राज्यभरातील पेट्रोल पंप चालकांकडून कोटय़वधी रुपये उकळल्याची तक्रार नागपुरातील एका पेट्रोल पंप चालकाने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

या प्रकरणातील कंपनीच्या कथित दोन अधिकाऱ्यांविरुद्ध आमच्याकडे तक्रार प्राप्त झालेली नाही. ती आल्यावर पुढील कारवाई बाबत निर्णय घेतला जाईल.

–  मनोज पाठक, मुख्य विभागीय व्यवस्थापक, इंडियन ऑईल, नागपूर

इंधन चोरी प्रकरणात ठाणे पोलिसांनी राज्यभरातील पेट्रोल पंपांवर छापे टाकले. ही कारवाई इंधन चोरी रोखण्यासाठी नव्हती, तर खंडणीसाठी केलेले योजनाबद्ध षडयंत्र होते, असे आता दिसून येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी.

धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2017 4:07 am

Web Title: issue of action on petrol pumps thane police
Next Stories
1 रायगडातील आरोग्य यंत्रणेचा कायापालट होणार
2 सोलापुरात माय-लेकाचा विहिरीत बुडून मृत्यू
3 ‘आम्ही म्हणू ती पूर्व दिशा असे म्हणणाऱ्यांना सणसणीत चपराक’
Just Now!
X