हर्षद कशाळकर

गेल्या वर्षभरात रायगड जिल्ह्य़ात २४ औद्योगिक दुर्घटना घडल्या. यात १४ कामगार तर दोन नागरिकांचा मृत्यू झाला. एवढे अपघात होऊनही औद्योगिक सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप के ला जातो.

रायगड जिल्ह्य़ात रासायनिक कंपन्यांचे प्रमाण अधिक आहे. यात रसायनी येथील पातळगंगा इंडस्ट्रियल इस्टेट, रोहा येथील धाटाव आणि महाड येथील औद्योगिक वसाहतींचा समवेश आहे.

रोहा औद्योगिक वसाहतीत एकूण ३४ कंपन्या आहेत. यातील सध्या २८ कंपन्या सुरू आहेत आणि त्या रासायनिक आहेत. महाड औद्योगिक वसाहतीत ७० कंपन्या आहेत यातील ३० कंपन्या या रासायनिक उत्पादने घेणाऱ्या आहेत. नागोठणे, रसायनी आणि तळोजा येथेही रासायनिक कंपन्या मोठय़ा प्रमाणात कार्यरत आहेत. याशिवाय आरसीएफचा खत आणि लिक्विड अमोनिया प्रकल्प, आरपीसीएलचे पेट्रोकेमिकचा पेट्रोकेमिकल प्रकल्प, ओएनजीसी एचपीसीएल आणि गेलचे गॅस प्रकल्प जिल्ह्य़ात आहेत. त्यामुळे औद्योगिक सुरक्षेला गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.

गेल्या वर्षभरात जिल्ह्य़ात २४ औद्योगिक दुर्घटना घडल्या. यात १० प्राणघातक अपघात, ७ आग लागण्याच्या घटना, २ औद्योगिक कंपन्यामधील स्फोट तर ५ वायमू गळतीच्या घटनांचा सामावेश आहे. चिंताजनक बाब म्हणजे या दुर्घटनामध्ये १४ कामगार व २ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य सहा जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत.

तीन वर्षांत जिल्ह्य़ात औद्योगिक कंपन्यामधील वायू गळतीच्या १० दुर्घटना घडल्या होत्या यात दोन जणांचा मृत्यू झाला तर १६ जण जखमी झाले होते. प्राणीमात्रांना या औद्योगिक दुर्घटनांची झळ पोहोचली आहे.

२०१९ रसायनी येथील एचओसी कंपनीतून वायू गळती होऊन दुर्घटना घडली. यात ३१ माकडं आणि अनेक पक्ष्यांचा हकनाक बळी गेला होता.     सातत्याने होणाऱ्या या घटना संभाव्य धोक्याची सूचना देत आहे. मात्र याकडे प्रशासकीय यंत्रणाचे दुर्लक्ष आहे. जुजबी बैठका, शासकीय फतव्यांचे कागदीघोडे नाचविण्यापलीकडे काहीच होताना दिसत नाही.

कंपन्यांचे दुर्लक्ष

रासायनिक अपघात झाल्यानंतर स्थानिक पोलिसांकडे गुन्हे दाखल केले जातात. पण तांत्रिक माहिती आणि तपास कसा करावा याचे ज्ञान नसल्याने पुढील कारवाई होताना दिसत नाही. रासायनिक कंपन्यांची सुरक्षा तपासणी योग्य प्रकारे केली जात नाही. सुरक्षेची मानकेही पाळली जात नाही. अनेक रासायनिक कंपन्यामध्ये पूर्ण वेळ कंपनी सुरक्षा अधिकारीची नेमणूक केली जात नाही. कंत्राटी पद्धतीने या अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाते.

जिल्ह्य़ात एखादा प्रकल्प आणताना त्यांची जनसुनावणी घेतली जाते. यावेळी संबंधित कंपनी स्थानिकांना सुरक्षेची हमी देते. नंतर मात्र प्रकल्प कार्यान्वित झाल्यावर सुरक्षेचे नियम धाब्यावर बसविले जातात.

मॅगनॅटिक महाराष्ट्र २.० अंतर्गत रायगड जवळपास २१ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा समावेश आहे. मुरुड, अलिबाग, रोहा तालुक्यात नव्याने औद्योगिक वसाहती उभारण्यात येणार आहे. त्यामुळे  कंपन्यांची संख्या वाढणार आहे. ही बाब लक्षात घेऊन औद्योगिक प्रकल्पांच्या सुरक्षिततेकडे जास्त भर देणे गरजेचे आहे.

यंत्रणेचा अभाव

महत्त्वाची बाब म्हणजे आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी ऑफ साइट इमर्जन्सी ग्रुप स्थापन करणे गरजेचे असते. हा समूह औद्योगिक वसाहतींमधील विविध कंपन्या सामूहिकरीत्या राबवत असतात. रासायनिक अपघात झाल्यास मदत बचाव कार्य करणे आणि रासायनिक घटकांपासून उद्भवणारे धोके रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे कंपन्या परिचालन सुरळीत करणे यासारखी कामे हा समूह करत असतो. मात्र बहुतांश औद्योगिक वसाहतीमध्ये असे आपत्ती व्यवस्थापन करणारे ग्रुप अस्तित्वातच नाही. जिल्ह्य़ातील औद्योगिक वसाहतींमधील सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक आपत्ती व्यवस्थापन समिती स्थापन केली जात असते. दर तीन महिन्यांनी ही समिती औद्योगिक वसाहतीमधील सुरक्षात्मक उपाययोजनांचा आढावा घेत असते. मात्र गेल्या अशा समित्यांची एकही बैठक झाली नसल्याचे स्थानिक सांगतात.

औद्योगिक कंपन्यांमधील अपघातांना अनेक घटक कारणीभूत ठरतात. विशेषत: रासायनिक कंपन्यांमध्ये काम करणारे कामगार हे अत्यंत कुशल असणे आवश्यक असते, त्यांना रासायनिक पदार्थ हाताळण्याचे ज्ञान असणेही आवश्यक असते. मात्र रसायने हाताळण्याचे अपुरे ज्ञान असलेले कामगार हे पदार्थ हाताळतात. हाताळताना सुरक्षा नियमांचे ते पालन करत नाहीत, त्यामुळे दुर्घटना घडतात. त्यामुळे कुशल कामगारांची नेमणूक करणेही औद्योगिक सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे.

–  विनोद देशमुख, महाड उत्पादक संघटना

बरेचदा कंपन्यांकडून देखभाल दुरुस्तीची कामे केली जात नाहीत. त्याचबरोबर कामगार आणि कंपनी प्रशासन यांच्याकडून यंत्रणाची हाताळताना योग्य काळजी घेतली जात नाही. त्यामुळे अशा दुर्घटना घडतात. ही बाब लक्षात घेऊन आम्ही सर्व कंपन्यांना महिन्याला मॉक ड्रिल्स घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. कामगार प्रशिक्षण आणि सुरक्षाविषयक प्रशिक्षण घेतले जात आहे.

– एम आर पाटील, सहसंचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग रायगड