News Flash

सागरी प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर

मुंबहून मांडवाकडे येणाऱ्या बोटीला शनिवारी अपघात झाला. या बोटीतील ८८ प्रवासी थोडक्यात बचावले.

मांडवा बोट दुर्घटनेतून बोध घेणे गरजेचे

हर्षद कशाळकर, लोकसत्ता

अलिबाग : मुंबईहून मांडव्याकडे येणाऱ्या बोटीला झालेल्या अपघातामुळे जलप्रवासी वाहतुकीतील सुरक्षेचा मुद्दा चव्हाटय़ावर आला. मेरीटाईम बोर्डच्या माध्यमातून खाजगी आणि सार्वजनिक जलवाहतूक बोटीमधील सुरक्षा उपाययोजनांचा आढावा घेण्याची आवश्यकता व्यक्त के ली जात आहे.

मुंबहून मांडवाकडे येणाऱ्या बोटीला शनिवारी अपघात झाला. या बोटीतील ८८ प्रवासी थोडक्यात बचावले. पोलीसांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली असली तरी यातून अनेक प्रश्न उपस्थित झाले.  मुंबई ते मांडवा, मुंबई ते जेएनपीटी, मुंबई ते एलिफंटा आणि रेवस ते भाऊचा धक्का या मार्गांवर जलप्रवासी वाहतुक केली जाते. दररोज हजारो प्रवाशी या मार्गावरून प्रवास करत असतात. मुंबई ते मांडवा हा जलमार्ग प्रवासी वाहतुकीसाठी सर्वाधिक गजबजलेला मार्ग म्हणून ओळखला जातो. या मार्गावर तीन सार्वजनिक बोटींच्या माध्यमातून प्रवासी वाहतुक केली जाते. यातून दररोज तीन ते साडे तीन हजार तर शनिवार रविवारी पाच ते सात हजार प्रवासी वाहतूक होते. या शिवाय अनेक खाजगी स्पीड बोटी या मार्गावर कार्यरत असतात. पण शनिवारी झालेल्या अपघातामुळे या मार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

यापूर्वीही घटना..

अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या पायाभरणी समारोहासाठी जाण्यासाठी वापरण्यात आलेल्या खाजगी बोटींचा असाच अपघात झाला होता. ज्यात एका प्रवाश्याचा मृत्यू झाला तर अन्य २४ जणांचे जीव थोडक्यात बचावले होते. अपघातग्रस्त बोटीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरण्यात आले होते. बोटीची स्पीड नियंत्रणात नव्हती. बोटी मध्ये लाईफ जॅकेट्स आणि रिंग बोयाज अपुरे होते. अपघातानंतर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कुचकामी ठरल्या होत्या.

नियमांकडे काणाडोळा

महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रवासी जलवाहतूक करणाऱ्या बोटी जलवाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळत नाही. बरेचदा या कंपन्यांकडून क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक केली जाते. ज्याकडे मेरीटाईम बोर्डाचे अधिकारी कानाडोळा करतात. या बोटीमध्ये पुरेसे लाईफ जॅकेट्सही उपलब्ध नसतात. गेट वे ऑफ इंडिया लागणाऱ्या बोटींची संख्या अधिक असल्याने प्रवाशांना चढता उतरतांना अनेकदा तारेवरची कसरत करावी लागते. मांडवा बोट दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षेचा पुन्हा एकदा आढावा घेणे गरजेचे आहे.

खोल समुद्रात फायबर बनावटीच्या बोटी चालवणे धोकादायक आहे. तरीपण प्रवासी वाहतुकीसाठी फायबर स्पीड बोटींचा वापर केला जातो. विशेष म्हणजे या स्पीड बोटींना प्रवाशी वाहतुक करण्याचा परवानाच दिलेला नाही, या बोटींचा खाजगी वाहनाप्रमाणेच वापर होणे अपेक्षित आहे. मात्र तरीही  मांडवा ते गेट वे दरम्यान या बोटींमधून बेकायदेशीरपणे प्रवासी वाहतूक केली जात आहे. ज्याचे तिकीटही प्रवाशांना दिले जात नाही.

बोट अपघात प्रकरणी अजंटा कंपनीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी तसेच अपघातग्रस्त बोटीचा चालक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेरीटाईम बोर्डाकडे या दुर्घटने संदर्भातील अहवाल मागितला आहे. पण अद्याप तो उपलब्ध झालेला नाही. पाठपुरावा सुरु आहे. 

 धर्मराज सोनके, ,सहाय्यक पोलीस निरीक्षक मांडवा

जलप्रवासी बोटीमधून वाहतुक करणाऱ्या प्रत्येक प्रवाश्याचा विमा असावा अशी आम्ही सातत्याने मागणी करत आहोत. विशेष म्हणजे अपघात झाल्यास कंपनी जाबाबदार नाही अशी लेखी सुचना प्रवाश्यांना देण्यात येणाऱ्या तिकीटांवर छापली जात आहे. वारंवार पाठपुरावा करूनही मेरीटाईम बोर्ड याकडे दुर्लक्ष करत आहेत.  सुट्टीच्या दिवशी बोटींमध्ये जास्त प्रवासी भरले जातात.या बोटींवरही कधी कारवाई होत नाही.

 दिलीप जोग, अध्यक्ष वेलफेअर असोसिएशन फॉर पॅसेंजर ऑफ कोकण

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2020 3:19 am

Web Title: issue of passenger safety in water transport arise after mandwa boat accident zws 70
Next Stories
1 कृषी प्रक्रिया संस्थांकडून सरकारचीच फसवणूक
2 पंकजा मुंडे यांच्या शिक्षक बदली धोरणाला राष्ट्रवादीचा खो
3 मोटार विजेच्या खांबाला धडकली; रोहित्राखाली दबून चार ठार
Just Now!
X