दीडशे अधिकाऱ्यांची चंद्रपूर, नागपूरमध्ये कारवाई

चंद्रपूर: शेकडो कोटींच्या कोळसा चोरी प्रकरणी स्वामी फ्युएल या कोळसा कंपनीशी संबंधित संचालकांची निवासस्थाने, कार्यालये, गोदामावर आयकर विभागाने मोठी कारवाई केली. गुरुवारी सकाळी आयकर विभागाने केलेल्या कारवाईत नागपूर व चंद्रपूरच्या १५० आयकर अधिकाऱ्यांनी ४० इनोव्हा वाहनातून ही कारवाई केली. यातून कोळसा चोरीचे मोठे प्रकरण बाहेर येण्याची शक्यता आहे.  स्वामी फ्युएलचे संचालक रणजीतसिंग छाबडा, श्याम मित्तल (अग्रवाल), नितीन उपरे व रामविलास मित्तल (अग्रवाल) यांची चंद्रपूर, नागपूर येथील निवासस्थाने, कार्यालये तसेच बुटीबोरी, घुग्घुस, वणी व पडोली येथील कोळसा गोदामावर प्रामुख्याने छापे टाकले.

चंद्रपूर शहर अन् कोळसा चोरी हे नाते नवीन नसून यातून अनेकजण अल्पावधीत  कोटय़धीश झाले. भद्रावतीच्या कर्नाटक एम्टा तसेच विविध खाणीतून कोळसा चोरी होत असे. आज सकाळी गजानन मंदिर परिसरातील स्वामी फ्युएल कंपनीचे चार संचालक रणजीतसिंग छाबडा, श्याम मित्तल (अग्रवाल) व रामविलास मित्तल (अग्रवाल) यांची निवासस्थाने, कार्यालये, कोळसा गोदामावर छापे टाकले. नितीन उपरे यांचे नागपुरातील घर व बुटीबोरीतील कार्यालयावरही छापे टाकले. कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

आयकर अधिकारी बुटीबोरी येथे रात्री तीन वाजता एकत्र आले. तेथे आयकर मुख्य अधिकाऱ्यांनी प्रत्येक पथकाला जबाबदारी सोपवली. तेथून विविध पथकांनी कारवाईस प्रारंभ केला. वणी, घुग्घुस, पडोली, ताडाळी, नागाळा येथेही छापे टाकले. या कारवाईनंतर बरीच मोठी नावे समोर येण्याची शक्यता आहे. या कारवाईमुळे काही व्यापारी शहरातून गायब झाल्याची चर्चा आहे. श्याम मित्तल यांच्या घरी वर्षांपूर्वी पैशाच्या वादातून कंपनी व्यवस्थापकाने आत्महत्या केली होती. तेव्हा हे दाबले गेले होते. आता याचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.