सातारा पालिकेत अधिकाऱ्यांचे लाचलुचपत प्रकरण उघडकीस आल्याने, सातारा पालिका प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा अंकुश नसल्याचे स्पष्ट झाले आहे.सातारा पालिका ही सातारकरांची नव्हे तर, मनमानी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची  आहे. हे आत्ताच नाही अनेकदा सिध्द झाले आहे.  सातारकरांचा हितासाठी सत्ताधाऱ्यांनी पालिका प्रशासनावर अंकुश ठेवणे आवश्यक असल्याचे मत पालिकेतील विरोधी पक्ष असलेल्या नगर विकास आघाडीचे पक्षप्रतोद अमोल मोहिते यांनी व्यक्त केले आहे.

सातारा पालिकेच्या इतिहासात कधी घडला नाही असा प्रकार घडला आहे.उमुख्याधिकारी संचित धुमाळ, आरोग्य निरिक्षक गणेश टोपे, प्रवीण यादव आणि कानुगडे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. सातारा पालिकेतच लाच घेताना वरिष्ठ अधिकारी रंगेहात सापडतात हे कशाने द्योतक आहे. सत्ताधारी सातारा विकास आघाडीचा प्रशासनावर कोणत्याही प्रकारचा अंकुश नाही. गेल्या साडेतीन वर्षापासून सातारा पालिकेत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मनमानी सुरु आहे. सत्ताधारी अंतर्गत गटबाजी, गटतट यामध्येच अडकून पडले असल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे. सातारकरांनी नगर विकास आघाडीला विरोधात बसण्याचा कौल दिला. तो मान्य करून आम्ही सक्षम विरोधकाची भूमिका बजावत आहे. गेल्या साडेतीन वर्षांपासून चुकीच्या गोष्टींना वेळोवेळी कठोर विरोध तर चांगल्या कामाला पाठिंबा देत नेहमीच प्रशासनाला वेसण घालण्याचा प्रयत्न करत आली आहे. जिल्हाधिकारी, सर्वसाधारण सभा यातून आमची भूमिका सातत्याने स्पष्ट झाली असून यापुढेही चुकीच्या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत.  सातारा पालिका ही सातारकरांची मातृसंस्था आहे, याचा विसर सत्ताधाऱ्यांना पडला आहे. सत्ताधाऱ्यांना याचे भान नसल्यानेच पालिका प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी मनमानी करून, नको त्या उचापती करत आहेत. किमान आतातरी सत्ताधायांनी आपसातील मतभेद आणि गटबाजी विसरून सातारकरांचा हितासाठी पालिकेचा कारभार लोकाभिमुख करावा आणि प्रशासनावर अंकुश ठेवावा, जेणेकरून पालिकेच्या इतिहासाला काळिमा फासणारे प्रकार पडणार नाहीत. असे अमोल मोहिते यांनी म्हटले.

जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे –
लाचखोरांवर कठोर कारवाई करावी.नगरपालिका संचालयाने संचित धुमाळ यांची थेट नियुक्ती केली होती. बाहेरगावहून आलेल्या अधिकाऱ्यांना शहराविषयी आपुलकी व बांधिलकी कमी असते. त्यामुळे असे अधिकारी चुकीचे काम करतात.जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे.परंतु, यामध्ये निष्पाप लोकांवर अन्याय होऊ नये. मागील साडेतीन वर्षात शहरात सत्ताधाऱ्यानी अनेक विकास प्रकल्प राबविले आहेत.या घडलेल्या प्रकारचे कोणी राजकारण करू नये.हा प्रकार अक्षम्य असाच आहे. – माधवी कदम,नगराध्यक्षा ,सातारा